मुंबई ः प्रतिनिधी
टीम इंडियाला इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कंबर कसली आहे. दौर्याला एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याच तयारीचा एक खास व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या अजिंक्यपदासाठी दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी कसून सराव करीत आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी जडेजा मेहनत घेत आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यात जडेजा दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकला नव्हता. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायलन आणि इंग्लंड दौर्यासाठी त्याची निवड झाली आहे.
मैदानात बहारदार परफॉर्मन्ससाठी तयारीही तशीच हवी. त्यासाठी जडेजाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. बुधवारी त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत तो जीममध्ये असल्याचे दिसत आहे. इंग्लंड दौर्यासाठीची तयारी सुरू झाली आहे, असे त्याने व्हिडीओसाठीच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.