Breaking News

ऐतिहासिक गारंबी धरणाच्या नूतनीकरणाची गरज

मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तीन तालुक्यावर जंजिर्‍याच्या नवाबांची सत्ता होती. मुरुड येथील राजवाड्यातून नवाब आपला राज्यकारभार चालवत असत. सर सिद्धी अहमद खान या नवाबांचा हिंदू, मुस्लिम ऐक्य राखण्यात हातखंडा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुरुड येथे अनेक सोयी-सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत. शहरातील  लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी गारंबी धरण, शासकीय इमारतींना जागा, स्वतंत्र पोलीस ठाणे, शहराची विशिष्ठ रचना अशा अनेक गोष्टी त्यांनी प्राप्त करून दिल्या आहेत. शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जंजिरा संस्थानची राजधानी मुरुड या छोट्याशा शहरातील जनतेची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी,  यासाठी सिद्दी नबाबांनी व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क निमित्ताने 1892साली गारंबी धरण उभारले. नैसर्गिक जलस्रोतामध्ये धरण बांधून गुरुत्व पध्दतीने पाणी आणण्याची त्यांची किमया ही आजही वाखाणण्यात येते. गारंबी, नवेदर येथील जांभ्या दगडातून येणारे धरणाचे पाणी सर्वार्थाने उत्कृष्ट असून या प्रकल्पात वॉटर फिल्टर प्लँट नसूनही धरणातील पाणी आरोग्यास पोषक आहे. गारंबी धरण मुरुड – केळघर रस्त्यावर असून मुरुड पासुन आठ कि.मी. अंतरावर आहे. 1960मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी गारंबी धरणाला भेट दिली होती. गारंबी धरण सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीचे असल्याने त्याला लहान मोठी छिद्रे पडून पाण्याची गळती होत आहे. पाणी गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना न झाल्याने पाणीसाठा दीर्घकाळ टिकून रहात नाही. या धरणातून 1970पर्यंत मुरुडमधील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत होते. त्यानंतर पाण्याचा तुडवडा भासत आहे.1992 मध्ये राज्य शासनाने ही पाणी योजना मुरुड नगर परिषदेकडे सुपूर्द केली आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियानाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव प्रशांत पाटील (नासिक) यांनी नुकतीच गारंबी धरणाची पाहणी केली. यावेळी मुरूड नगर परिषद पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर, नगरसेवक  प्रमोद भायदे, बी. एस. जाधव, उखाजी चौधरी, नंदकुमार उदावंत व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते. डोंगर उतारावरून येणारे पाणी अडविण्यासाठी धरणाची उंची व पाणी साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसेच गारंबी धरण खुप जुने असल्याने मृत पाण्याचा साठा दीर्घकालीन राहण्यासाठी धरणाचा नविन प्रस्ताव आवश्यक आहे. त्यासाठी मुरूड नगर परिषदेने महाराष्ट्र शासन तसेच नगरविकास व जलसंपदा विभागास प्रस्ताव सादर करून नवीन धरण उभारणीसाठी निधीची मागणी करावी. त्यामुळे गुरुत्व पद्धतीने निर्मळ पाणी मुरूडमधील जनतेला पुर्ववत देता येणे शक्य असल्याचे मत प्रशांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. गारंबी धरण नवाब काळातील असून या धरणातून शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो.  धरण जुने झाल्याने लिकेजेस वाढून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ते पाणी अडवणे महत्वाचे आहे. धरण नवीन स्वरूपात बनवणे काळाची गरज आहे. यासाठी अभियंत्यांकडून तांत्रिक बाबींची पुर्तता करून फिल्टर प्लँटसह गारंबी धरणाचा नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे   पाठविणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पाटील यांनी या वेळी दिली दिली. गारंबी धरणातून शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो. मुरुड शहरातील नेमक्याच ठिकाणी हे पाणी पुरविले जाते.कालानुरूप धरण जुने झाल्याने त्यातून पाण्याची गळती होत आहे. तसेच शहराची लोकसंख्या वाढत असून, नवीन धरण बांधणे गरजेचे झाले आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियानाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव प्रशांत पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे गारंबी या ठिकाणी नवीन धरण बांधण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. प्रस्ताव तयार होताच तो नगरविकास खात्याकडे सादर करण्यात येईल, असे पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर यांनी सांगितले. सध्या मुरुड शहराला आंबोली व गारंबी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु आंबोली धरणाचे पाणी भविष्यात दिघी बंदर विकासासाठी वापरण्याची दाट शक्यता असल्याने शहराला पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.  शहराची वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारा विकास पहाता पर्यायी पाणी व्यवस्था अमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी गारंबी धरण नव्याने बांधणे हे खूप आवश्यक झाले आहे. गारंबी धरण नव्याने बांधल्यास मुरुड शहरासाठी मोठा पाणी साठा उपलब्ध होऊन स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. नवीन गारंबी धरण तातडीने पूर्ण व्हावे, अशी मुरूडमधील नागरिकांची इच्छा आहे.

-संजय करडे

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply