पहिल्या सामन्यात 5-1ने मिळविला विजय
भुवनेश्वर : वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अमेरिकेचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवला आहे. ओडिशातील कलिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपले वर्चस्व गाजवले.
भारताच्या विजयात गुरजीत कौरने निर्णायक भूमिका निभावली. गुरजीतने दोन अप्रतिम गोल डागले, तर लिलिमा मिंज, शर्मिला आणि सलिमा तेते या तिघींनी प्रत्येकी एकेक गोल डागून भारताचा विजय सोपा केला. या विजयामुळे भारतीय संघ ऑलिम्पिक पात्रतेच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.
या सामन्यात भारतीय महिला संघाचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या 15 मिनिटांचा खेळ गोलरहित राहिला, मात्र यादरम्यान भारताचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. गोल करण्यात यश आलं नसलं तरी भारताच्या आक्रमणामुळे पाहुणा संघ दबावाखाली गेला होता. दुसर्या क्वार्टरमध्ये चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. प्रथम भारताला व नंतर पाहुण्या संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र दोन्ही संघांना त्याचा फायदा उठवता आला नाही. त्यानंतर 28व्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि ही संधी भारताने दवडली नाही. लिलिमा मिंजने शानदार गोल डागत भारताला आघाडी मिळवून दिली.