Breaking News

रायगडात नवीन रास्त भाव दुकानांचे 81 प्रस्ताव मंजूर

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात नविन रास्त भाव दुकानांसाठी 236 जाहीरनामे प्रसिध्द करण्यात आले होते. यापैकी केवळ 81 प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 236 नवीन रास्त भाव दुकानांसाठी पुरवठा विभागाने जाहीरनामे प्रसिध्द केले होते. आलेल्या प्रस्तांवापैकी केवळ 81 प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. उर्वरीत प्रस्ताव तांत्रिक बाबी पुढे करून फेटाळण्यात आले आहेत. 

रायगड जिल्ह्यात 2001 महसुली गावे आहेत. तर रास्त भाव दुकानांची संख्या एक हजार 369 आहे. 2014 पासून जिल्ह्यात नवीन दुकानांसाठी जाहीरनामे प्रसिध्द करण्याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होत होते. टाळेबंदीच्या काळात रास्त भाव दुकानांची गरज लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने 236 नवीन दुकांनासाठी जाहीरनामे प्रसिध्द केले होते. यात  अलिबागमधील 38, पनवेलमधील 35, महाडमधील 35, कर्जतमधील 21 दुकानांचा समावेश होता.

प्रत्यक्षात 236 पैकी 81दुकानांचे जाहीरनामे मंजूर करण्यात आले आहेत. अलिबागमधील 10, पनवेलमधील 10, कर्जतमधील 15नवीन दुकानांना मंजूरी मिळाली आहे. उर्वरीत प्रस्ताव तांत्रिक बाबींची पुर्तता न केल्याने फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांना नवीन रास्त भाव दुकानांसाठी आणखी काही कालावधीसाठी वाट पहावी लागणार आहे.

जिल्ह्यात 236 दुकानांसाठी जाहीरनामे प्रसिध्द करण्यात आले होते. यापैकी 81प्रस्ताव मंजूर करून तालुका पुरवठा अधिकार्‍याकडे पाठविण्यात आले आहेत. ज्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत, त्यांना पुरवठा उपायुक्तांकडे दाद मागता येईल.

-मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply