कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे आता रोजगाराच्या शोधात असलेल्यांना लुटण्याचा धंदा शहरात आणि ग्रामीण भागात आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. घर बसल्या पार्टटाइम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एण्ट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा आणि मोबाईल टॉवरचे दरमहा हजारो रुपये भाडे मिळवा, अशा जाहिराती आपण लोकल ट्रेनमध्ये लावलेल्या आणि वर्तमानपत्रात नेहमी वाचत असतो. या जाहिराती वाचल्यावर अनेकांना झटपट पैसे कमावण्याची संधी साधण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. अशा जाहिराती करून बेकारांना फसवण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरू आहे. मोबाईल टॉवर सोडला तर फसवले गेल्याची रक्कम छोटी असल्याने पोलिसांचा त्रास नको म्हणून कोणी तक्रार करीत नाही. त्यामुळे पोलीसही दुर्लक्ष करीत असल्याने महिना करोडो रूपयांचा फसवणुकीचा हा धंदा तेजीत सुरु आहे. घर बसल्या पार्टटाइम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एण्ट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा, अशा जाहिराती वाचून त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसलेली रिसेप्शनिस्ट तरूणी तुमचे स्वागत करते. सर, कामात आहेत, तुम्ही जरा वेळ बसा, असे सांगते. एकजण तुम्हाला पाणी आणून देतो. आजूबाजूला नोटीस बोर्डवर मराठी पुस्तकांचे कव्हर टाचणीने लावलेली असतात. तुमच्यासारखे आणखी तीन चार जण तिथे बसलेले असतात. काही वेळात आणखी काही जण येतात. मग तुम्हाला केबिनमध्ये बोलावले जाते. आतमध्ये बसलेली व्यक्ती तुमची विचारपूस करते. कोठून आलात, काय करता, तुमची थोडीशी कौटूंबिक माहिती विचारली जाते आणि रजिस्ट्रेशन फी म्हणून एक हजारपासून 1500रुपयांपर्यंत रक्कम भरायला सांगितले जाते. यानंतर 5-6 जणांच्या ग्रुपला एकत्र बसवून तेथील तरूणी तुम्हाला कामाची माहिती देते. ती तरूणी तुम्हाला एक मराठी पुस्तक दाखवते. त्याची कॉपी कागदावर पेनने करून आणायची आहे. तुम्हाला कोरे पेपर आणि पेन आम्ही देऊ त्यावर रेषा मारून तुम्ही लिहायचे आहे. तुम्हाला एका पानाचे 20-30 रुपये मिळतील. त्यामध्ये चूका झाल्यास पैसे कापले जातील 10पेक्षा जास्त चुका झाल्यास त्या पानाचे पैसे मिळणार नाहीत. काम दिसायला सोपे असते. कोणालाही वाटते आपण दिवसात सहज 15-20पाने लिहू शकतो. म्हणजे 500-600रुपये घरबसल्या सहज मिळवू शकतो. त्यामुळे ते सगळे काम करायला लगेच तयार होतात. मग तुम्हाला बाहेर जाऊन साहित्य घेण्यास सांगितले जाते. दूसरा ग्रुप आत येतो. तुम्हाला भरलेल्या पैशाच्या मोबदल्यात एक दोन रुपयाचा पेन, दोन डझन कोरे कागद आणि एका पुस्तकाची काही पाने दिली जातात. हे काम 15दिवसात पूर्ण करा, मग पुढील काम मिळेल. दिलेले काम तपासल्यावर त्याचे पैसे आठवड्याने तुम्हाला मिळतील, असे सांगितले जाते. काम घेऊन तुम्ही खुशीत घरी येता. मग कामाला सुरुवात केल्यावर कळते की बारीक टाइपमध्ये असलेल्या पुस्तकाची कॉपी करणे सोपे नाही. दोन तासात एक पान पूर्ण होते. त्यामध्ये अनेक चूका झालेल्या असतात, म्हणजे दोन तास काम करून दोन रुपयेही मिळू शकत नाहीत, हे लक्षात येते. मग आपले डोळे उघडतात की आपण दोन रुपयांचे पेन आणि दोन डझन कागदासाठी हजार किवा जास्त रुपये देऊन पुस्तकाची पाने म्हणजे रद्दी घेऊन आलो आहोत. पण ऑफिस टाकून बसलेल्यांना रोज 10माणसे तरी मिळाली, असे गृहीत धरले तर दिवसाला दहा हजार कोठेच गेले नाहीत. म्हणजे महिना दोन लाख 60 हजार. त्यापैकी पगार, जागेचे भाडे आणि इतर खर्च मिळून 60 हजार गेले, तरी दोन लाख रुपये मिळतात. अशा प्रकारे सुशिक्षीत बेकारांना फसविण्याचा हा धंदा सध्या जोरात सुरू आहे. हजार दीड हजार रुपयाची तक्रार करून पोलीस चौकशीला तोंड देण्यापेक्षा कोणी तक्रारच करीत नाही. पण एकूण आकडा काढला तर महिना करोडो रूपयांचा चुना लावण्याचा हा धंदा सध्या राजरोस सुरू आहे. नामांकित कंपनीचे मोबाइल टॉवर आपल्या जागेत लावा, महिना हजारो रुपये भाडे आणि बिनव्याजी लाखो रूपये अनामत रक्कम मिळवा, असे आमिष दाखवून लुटण्याचा धंदा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. अनेक गावातील लोकांना मोबाइलवर मेसेज पाठवून तुमच्याकडे जागा असेल तर मोबाइल टॉवर बसावा, महिना हजारो रुपये भाडे आणि लाखो रुपये डिपॉझिटस मिळवा, अशी जाहिरात केली जाते. करोनामुळे रोजगार नाही, त्यामुळे अनेकजण या जाहिरातीला प्रतिसाद देतात. जागा मालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, जागेचे पेपर आणि फोटो घेऊन त्यांचा भाडेकरार तयार करून पाठवतात. त्यासोबत जागेचा गुगल नकाशा, आराखडा पाठवला जातो. त्यामुळे जागा मालकाचा विश्वास बसतो. त्यानंतर खर्या खेळाला सुरुवात होते. त्यांच्या वकिलांचा फोन येतो, तुमचा डिपॉझिटसचा 25-30लाखाचा चेक तयार आहे, तुम्ही फक्त 18टक्के जीएसटी आणि 12टक्के इन्कमटॅक्स टीडीएसची रक्कम आमच्या खात्यात भरा. सोबत तुमच्या नावाचा लाखो रुपये रक्कमेच्या चेकचा फोटो असतो. कंपनीचा वकील म्हणून सांगणारी व्यक्ती आणि ऑफिसमधील तरुणी रोज फोन करून तुमचा कसा फायदा होईल हे सांगून लवकर पैसे भरा नाही, तर दुसर्या व्यक्ती तयार आहेत, असे सांगतात. कोरोंनामुळे आर्थिक तंगी असलेली व्यक्ती मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैसे गोळा करून लगेच भरते आणि काही लाखापासून हजारो रुपयांपर्यंत त्याची फसवणूक होते. यामधील बहुतांशी गुन्हेगार परराज्यातील असल्याने आणि नंतर ते फोन बंद होत असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होते, असे पोलिसांकडून समजते. -नितीन देशमुख
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …