उरण : वार्ताहर
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2021/02/lead-pic-1.jpeg-wb.jpg)
उरण तालुक्यातील बुधवारी (दि. 10) झालेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतीवर भाजप आणि मित्रपक्षांचा झेंडा फडकला आहे. स्थानिक पातळीवर भाजप आणि मित्रपक्षाची युती होऊन हा झेंडा फडकला आहे. उरणच्या भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांनी निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. चाणजे ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे मंगेश थळी व उपसरपंचपदी अशोक नाखवा यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सरपंचपदाचा कालावधी अडीच वर्षे शिवसेनेचा असेल आणि नंतर अडीच वर्षे भाजपचा असेल. तसेच म्हातवली ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत झेंडा फडकला आहे. यामध्ये सरपंचपदी शेकापच्या रंजना चारुदत्त पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी भाजपच्या पल्लवी पराग म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सरपंच आणि उपसरपंच यांचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. उरण येथील भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांनी चाणजे व म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले. या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, नगरसेवक राजेश ठाकूर, नित्यानंद भोईर, चंद्रकांत गायकवाड, हितेश शहा, देवेंद्र घरत, महेश घरत, राकेश म्हात्रे, चारुदत्त पाटील, रिना शिरधनकर, प्रदीप थळी, सुरज ठवले, पराग म्हात्रे आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.