Breaking News

शिवगान स्पर्धा 2021  : मानसी जगताप, सामगंध कला केंद्र करणार उत्तर रायगडचे नेतृत्व

सातारा येथे रंगणार अंतिम फेरी

पनवेल : राम प्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत झालेल्या उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीतील स्पर्धेत पनवेलच्या मानसी जगताप यांनी वैयक्तिक गटात, तर पनवेलच्याच सामगंध कला केंद्राने सांघिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला असून, ते सातारा येथे होणार्‍या अंतिम फेरीत उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे आयोजन भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात करण्यात आले आहे.
स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याकडून चमकदार कामगिरी व्हावी यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरी स्पर्धा सीकेटी महाविद्यालयात आयोजिण्यात आली होती.  स्पर्धेतील वैयक्तिक गटात 63 स्पर्धकांनी, तर सांघिक गटात नऊ स्पर्धक संघानी सहभाग घेतला होता.  
वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत पनवेलच्या मानसी जगताप यांनी प्रथम क्रमांक (सात हजार रुपये) पटकाविला. द्वितीय क्रमांक कर्जत येथील नयन गवळी (पाच हजार रुपये), तर तृतीय क्रमांक कर्जत येथील शाल्मली कांबळे (तीन हजार रुपये), उत्तेजनार्थ क्रमांक कर्जतचे भूषण लोभी व महेश मार्के यांनी मिळविला, तर सांघिक गीत गायन स्पर्धेत पनवेलच्या सामगंध कला केंद्राने प्रथम (11 हजार रुपये) क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक शाहिरी गर्जना कलामंच, कर्जत (सात हजार 500 रुपये), तृतीय क्रमांक सीकेटी कॉलेज पनवेल (पाच हजार 100 रुपये) तसेच उत्तेजनार्थ क्रमांक श्री समर्थ सखाराम पाटील व सहकारी उरण आणि दुर्गादेवी मंडळ कर्जत यांनी प्राप्त केला.
सर्व विजेत्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य, उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, परीक्षक विवेक भागवत आणि वैभव घरत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी सातारा येथील अजिंक्यतारा गड येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत मानसी जगताप वैयक्तिक गटातून, तर सामगंध कला केंद्र सांघिक गटातून उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply