आंधळं दळतंय… अशी एक मासलेवाईक म्हण आपल्या मराठी भाषेत आहे. ती महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला अगदी अचूक लागू पडते. मविआ सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्षे होतील, परंतु घोटाळे, भ्रष्टाचार, सत्तेचा मस्तवालपणा आणि बजबजपुरीची चर्चा झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. उद्धवा, अजब तुझे सरकार ही ओळ जणू मविआ सरकारसाठीच लिहिली गेली असावी अशी परिस्थिती आहे.
महाविकास आघाडी सरकारातील वीजमंत्र्यांवर त्यांच्याच पक्षाचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करतात. एका युवतीच्या गूढ मृत्यूप्रकरणी वनमंत्र्याला घरचा रस्ता पकडावा लागतो. परिवहनमंत्र्यांचे रिसॉर्टचे बांधकाम अनेकांच्या भिवया उंचावणारे ठरते. एका ज्येष्ठ मंत्र्याचे जावई गांजाच्या तस्करीत जेलची हवा खाऊन येतात. या सरकारातील माजी गृहमंत्र्यांचा वादाच्या भोवर्यात सापडल्यानंतर थांगपत्ता लागत नाही. मुंबईसारख्या महानगराचा पोलीस आयुक्त परदेशात पळून गेल्याची जोरदार चर्चा होते. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. याच माळेतील आणखी एक कडी गुरुवारी गोवली गेली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले. सायंकाळनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. दीड वर्षापूर्वी अनंत करमुसे नावाच्या एका सिव्हिल अभियंत्याला आव्हाड यांच्या राहत्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली होती. यात तीन-चार पोलीस देखील सामील होते. याशिवाय आव्हाड यांचे तथाकथित कार्यकर्ते देखील मारहाणीत सामील झाले असे दिसते. विशेष म्हणजे अनंत करमुसे यांना मारहाण झाली तेव्हा राज्याचे गृहनिर्माणमंत्री तेथे उपस्थित होते. हिंदी चित्रपटात उत्तरेतील एखादा बाहुबली ज्याप्रमाणे रयतेतील निरुपद्रवी व्यक्तिरेखेला शिक्षा देतो, तशाच प्रकारचे हे दृश्य माध्यमांनी रंगवले होते. दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या मारहाणीच्या घटनेला अखेर गुरुवारी योग्य ती दिशा मिळाली. करमुसे यांनी आव्हाड यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या भयंकर गुन्ह्याबद्दल त्यांना आव्हाड यांच्या गुंडांनी शिक्षा दिली. ठाणे पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात नसल्याची तक्रार करमुसे यांनी आपल्या वकिलामार्फत माननीय उच्च न्यायालयात गुदरली होती. याची दखल घेत न्यायालयाने आदेश जारी केले. तेव्हा कुठे पोलिसांनी माननीय गृहनिर्माण मंत्र्यांना अटक करण्याचा उपचार पार पाडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आव्हाड यांना अटक होऊन न्यायालयासमोर उभे केल्याची बातमी कुठल्याही टीव्ही वाहिनीवर कुणी पाहिली नाही. त्यांना जामीन मिळून ते घरी पोहोचल्यानंतरच बातमी फुटली. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिल्यानंतरच आव्हाड यांच्या अटकेची बातमी जगाला कळली. एवढी गुपचूप कारवाई कशाकरिता हा खरा प्रश्न आहे. एरव्ही संशयित आरोपीवर होणार्या कारवाया दाखवताना टीव्ही वाहिन्यांच्या कॅमर्यांची नुसती चढाओढ लागते. महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा नेता आणि मंत्री असलेल्या व्यक्तीला अटक होते ही बातमी मात्र अंशत: दडवली जाते हे अनाकलनीय आहे. अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणीचा खटला न्यायालयात चालेल आणि त्याचा योग्य तो फैसला देखील होईल. महाविकास आघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरणांच्या लांबलेल्या यादीत आणखी एका प्रकरणाची भर पडली, एवढे मात्र या घटनेमुळे सिद्ध झाले. एवढे होऊन देखील मविआ सरकारमधील नेते निगरगट्टपणे खुर्चीला घट्ट चिकटून बसले आहेत, याला काय म्हणायचे?
Check Also
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ
स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …