Breaking News

पमपा क्षेत्रात पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणास पुन्हा सुरुवात

पनवेल : वार्ताहर

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान पालिकेच्या वतीने राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागात मागील वर्षी पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण चालू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

पथविक्रेते अर्थात फेरीवाला ठेलेवाला, रेहरीवाला ठेलीफडवाला ज्यांच्याद्वारे भाज्या, फळे तयार खाद्यपदार्थ चहा, भजी, पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीरद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके, स्टेशनरी अशा वस्तूंचा पुरवठा करणारे विक्रेते याशिवाय केशकर्तन दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने यांचाही यात समावेश होतो.

मागील वर्षी पालिकेच्यावतीने 6502 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता उर्वरित पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणानंतर अंतिम यादी शहर फेरीवाला समितीच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम यादीतील पथविक्रेत्यांना पालिकेच्या वतीने ‘अधिकृत पथविक्रते’ म्हणून ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांनी आठ दिवसाच्या आत  प्रभागसमिती ‘ड’ मध्ये आपली कागदपत्रे जमा करावी असे  विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत 2500 पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. उर्वरित पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पंतप्रधान आत्मनिर्भर निधीचा लाभ घेण्याचे आवाहन

पंतप्रधान आत्मनिर्भर निधीतून पथविक्रेत्यांना 10 हजार रुपये कर्ज दिले जाते. पालिकेला सात हजार पथविक्रेत्यांचे अर्ज भरण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 4377 अर्ज भरले गेले आहेत. या योजनेचा लाभ पथविक्रेत्यांनी करून घ्यावा, यासाठी आपल्या प्रभागातील महापालिका कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply