नवी मुंबई ः बातमीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य राम मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि. 5) होत आहे. नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसाठी हा आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असल्याने हा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी घरी राहून दिवाळी-दसर्यासारखा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
अयोध्येत राम जन्मस्थानी राम मंदिर व्हावे हे स्वप्न सत्यात उतरत आहे. यासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. यानिमित्ताने एक प्रदीर्घ लढा सफल होत आहे. भारतीय जनता पक्षाचे या लढ्यात मोठे योगदान आहे. राम मंदिर आंदोलनात अनेक कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते. आपल्या आयुष्यातील हा ऐतिहासिक दिवस आहे. कोविडमुळे उत्स्फूर्तपणे हा क्षण व भूमिपूजन उत्सव साजरा करता येणार नसल्याने कार्यकर्त्यांनी हा दिवस वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळी-दसर्यासारखा साजरा करावा, मात्र कोरोनाचे भान ठेवत सामूहिक उत्सव करण्याचे टाळावे, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
या वेळी सर्वांनी घरावर रोषणाई करून गुढी उभारावी. दिवाळीप्रमाणे आकाश कंदील लावावा. घरासमोर पणत्या लावून रांगोळी काढावी. घरी आवर्जून गोड पदार्थ करावेत. घरात कुटुंबीयांसह टीव्हीवर भूमिपूजन कार्यक्रम पाहावा. वैयक्तिक पातळीरील उत्सवाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून मित्रांसोबत आनंद साजरा करावा. घरोघरी उत्सव साजरा करतानाच भाजपच्या नवी मुंबईतील सर्व कार्यालयांवर रोषणाई करून राम मंदिराचे फलक लावावेत. पक्ष कार्यालयांसमोर रांगोळी काढून पारंपरिक दिवे लावावेत, मात्र हे करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.