बंदर निरीक्षकांकडून बोटमालकाला तंबी;
कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश
मुरूड : प्रतिनिधी
मच्छिमारी करताना जाळ्यात अडकलेला प्लास्टिक कचरा राजपुरी येथील एका बोटीतून खोल समुद्रात टाकण्याचा प्रयत्न आगरदांडा जेट्टी परिसरात सुरू होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे व मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेतल्याने प्लास्टिक कचरा समुद्रात टाकण्याचा डाव फसला असून या कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश आले आहे.
येथील समाजसेवक गिरीष साळी आगरदांडा जेट्टी येथून दिघीमार्गे श्रीवर्धनला जात होते. या वेळी त्यांना एक मच्छिमार नौका जेट्टीलगत जाळ्यात अडकलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करीत असल्याचे दिसले. गिरीष साळी यांनी त्याबाबत विचारणा केली असता नौकेवरील कामगारांनी सांगितले की, हा प्लास्टिक कचरा आम्ही खोल समुद्रात टाकणार आहोत. साळी यांनी स्थानिक पत्रकारांना हा प्रकार सांगितला, पत्रकारांनी आगरदांडा बंदराचे निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून तातडीने बोट मालकाला तंबी देण्यास सांगितले. कुलकर्णी यांनी राजपुरी येथील बोट मालकाचा शोध घेतला व मोठ्या प्रमाणात गोळा केलेल्या प्लास्टिक कचर्याची योग्य विल्हेवाट लावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली. त्यामुळे बोट मालकाने सदर कचरा जेट्टीवरून उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली.