मुरुड : प्रतिनिधी
स्थानिक नागरिकांना विचारात न घेता मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा परिसरात चुकीच्या पद्दतीने मोरी बांधली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून पावसाळ्यात घरात पाणी घुसून येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी लक्ष घालून शहरातील लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुरूड मनसेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा परिसरात चुकीच्या पद्धतीने मोरी बांधली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील गणेश आळी व शेगवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून ते बागायत जमिनीत व अनेक घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र नगर परिषदेकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी आदेश देवूनही मुरुड नगर परिषदेने या मोरीतील सिमेंटचे पाइप काढले नाहीत. त्यामुळे परिस्थिती जैसे ते आहे, असे मनसेचे मुरुड तालुका अध्यक्ष शैलेश खोत व माजी अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निवेदनात म्हटले आहे. मुरुड नगर परिषद सदरचे पाइप काढत नसल्यामुळे शेगवाडा परिसरातील नागरिकांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्या वेळी उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी सदर मोरी परिसराची पाहणी करून पाइप काढून टाकण्याची सूचना केली होती. मात्र नगर परिषद त्याची अमलबजावणी करीत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाच्या करण्यात आली आहे.