चंदीगड ः वृत्तसंस्था
स्त्री-पुरुष गुणोत्तराच्या बाबतीत बाकी राज्यांपेक्षा बरेच मागे असणार्या पंजाबमधील एका गावामध्ये स्त्री शिक्षणासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातील भिडेवाडा येथून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाईंचा पुतळा मानसा तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत गावकर्यांनी आणि शिक्षकांनी स्वखर्चाने उभारला आहे.
मानसा येथील साड्डा सिंग वाला या गावात सावित्रीबाईंच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी एक पार्क उभे करण्यात आले आहे. गणित ही थीम असलेल्या या पार्कच्या मध्यभागी सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यादगरी पार्क (म्हणजेच सावित्रीबाई स्मृती पार्क) असे या पार्कला नाव देण्यात आले असून पार्कच्या मध्यभागी सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक अमलाक सिंग म्हणतात, मुलींच्या शिक्षणासाठी, दलितांच्या हक्कांसाठी, विधवा पुनर्विवाहासाठी आणि जातीयवादाविरोधात तसेच बालविवाहाविरोधात लढणार्या सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती पंजाबमधील लोकांना व्हावी यासाठी हे पार्क उभारण्यात आले आहे. या पुतळ्याच्या बाजूला ‘सावित्रीबाईंना आपण कायमच लक्षात ठेवणे का गरजेचे आहे?’ अशा मथळ्याचा फलक असून त्याखाली पंजाबी भाषेत सावित्रीबाईंची माहिती देण्यात आली आहे. हा पुतळा उभारण्यासाठी 52 हजारांचा खर्च आला. ही रक्कम शाळेतील शिक्षक आणि स्थानिकांनी वर्गणी गोळा करून जमा केली. या संपूर्ण पार्कसाठी एक लाख 70 हजारांचा खर्च आला. एका पैशाचीही सरकारी मदत न घेता हा निधी आम्ही उभारला असून मूर्ती दिल्लीमधील एका कारागिराने बनवली आहे. या गावातील शाळेमधील एकूण पटसंख्या 128 असून त्यापैकी 70 विद्यार्थिनी आहे. या शाळेत एकूण सात शिक्षक असून त्यापैकी तीन महिला शिक्षक आहेत. सर्व शिक्षिका या कॉन्ट्रॅक्टवर कामाला असून त्यांना दरमहा पाच हजार रुपये इतका पगार मिळतो.