Breaking News

भाजपचे संकल्पपत्र

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने निवडणूक जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र सादर करून सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी 75 आश्वासने या सरकारने पूर्ण केलेली आहेत. आता उर्वरित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी भाजपला संधी मिळणे आवश्यक आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपने सोमवारी निवडणूक जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र प्रसिद्ध करून देशातील जनतेच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे दाखवून दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची गेल्या पाच वर्षातील घोडदौड निश्चितच वाखाणण्याजोगी झालेली आहे. देशाला एक स्थिर, पारदर्शी सरकार देण्यात भाजप निश्चितच यशस्वी झालेला आहे. 50 वर्षे सत्तेत राहूनही जे काँग्रेसला जमले नाही ते मोदी सरकारने अवघ्या पाच वर्षात करून दाखविले आहे. अनेक संकल्पही केलेले आहेत. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी, तसेच देशसेवा करण्यासाठी पुढील पाच वर्षे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारला देशाची सत्ता द्या, असे आवाहन या संकल्पपत्रातून भाजपने केलेेले आहे. या संकल्पपत्रात समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजप धुरिणांनी केलेला आहे. त्याचबरोबरच गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राममंदिर बांधण्याचा मुद्दाही समाविष्ट करण्यात आला आहे. भाजपनेही ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या संकल्पपत्रातून शेतकर्‍यांना वर्षाला सरसकट सहा हजार रुपये आणि पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. संकल्पपत्रातून  संकल्पित भारत, सशक्त भारत अशी घोषणाही करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. या जाहीरनाम्यातून शेतकर्‍यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंतच्या सर्वांची काळजी घेतली आहे. सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करतानाच त्यांना फ्रि हँड देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे, तसेच छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. संकल्पपत्रामध्ये जनतेला 75 वचनं देण्यात आली असून लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपने देशातील जनतेला पारदर्शक, मजबूत आणि निर्णायक सरकारचे आश्वासन दिले असून भाजपला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आलेले आहे. मागच्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशाला निर्णायक सरकार दिले. दहशतवादाचे उगम स्थान असलेल्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून मोदी सरकारने यापुढे भारताला हलक्यामध्ये घेऊ नका, असा कठोर संदेश दिला. भारताचा 2014 ते 2019 मध्ये झालेला विकास इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. 2014 साली भारतीय अर्थव्यवस्था 11व्या स्थानी होती. आज जगात आपण सहाव्या स्थानावर आहोत. हे सारे मोदी सरकारच्या कामगिरीमुळेच घडल्याचा दावाही भाजपने केलेला आहे. एकूणच देशाला सशक्त बनविण्यासाठी भाजपचे हे संकल्पपत्र निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणे ही काळाची गरज बनलेली आहे. देशातील मतदार सुज्ञ आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपलाच संधी देईल हे निश्चित.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply