Breaking News

शेतजमीन भाजणी आणि पर्यावरण

पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती आणि त्याची प्रगती हा कालखंड काही लाख वर्षांपासूनचा आहे, मात्र ज्या 10 हजार वर्षापूर्वी मानवाने शेतीचा शोध लावला आणि जंगल तोडून शेतीसाठी जमीन मोकळी केली, तेव्हापासून पर्यावरणाचा र्‍हास सुरू झाला, मात्र त्या काळात त्याचे प्रमाण अल्प असले, तरी आज जगात शेतीच्या नावाखाली होणारी पर्यावरणाची हानीही परमोच्च बिंदूपर्यंत पोहचली आहे.

कोकणात भात लावणीच्या पूर्वमशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जमिनीची मशागत करण्याच्या उद्देशाने भातजमीन भाजणी केली जाते. यातून शेतकर्‍याचा वेळ आणि श्रम मात्र वाया जात असल्याचे दिसून येत आहे, मात्र हे प्रमाण कमी झालेले नाही. यामुळे यातून निघत असलेल्या धुराने प्रदूषण आणि तापमान वाढ होत आहे. शेतकर्‍यांमध्ये जागृती करून देखील हे प्रमाण कायम आहे.

कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या या रायगड जिल्ह्यात भात पीक घेण्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध झालेले असले, तरी आजही शेतकरी पारंपरिक शेतीच्या माध्यमातून भात पीक घेत आहेत. यातून श्रम, वेळ आणि पैसा वाया जात आहे. सध्या भात पीक घेताना उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी शेतकर्‍याची गत झाली आहे. यामुळे अधिकाधिक भात शेती पडिक झाली आहे. पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञान अवलंबल्यास यामध्ये बदल होऊ शकतो. भात उत्पादन घेताना शेतकरी खडे वेचणी, जमीन भाजणी, नांगरणी, बियाणे पेरणी, पुन्हा रोप लावणी, रोपांची लावणी करताना पुन्हा नांगरणी एवढ्या प्रक्रिया कराव्या लागत आहेत. यातील तरवा लावणे ही प्रक्रिया वेळ वाया घालवणारी आणि पर्यावरणाला बाधक आहे, मात्र जमीन भाजणी केल्याने रोपे जोमाने येतात असा गैरसमज शेतकर्‍यांमध्ये आहे. यामुळे झाडाच्या कोवळ्या फांद्या तोडून त्या ज्या जागेत भात रोपांची निर्मिती करायची आहे त्या ठिकाणी टाकून या फांद्या पेटवून दिल्या जातात. याला जमीन भाजणी पेक्षा तरवा हा शब्द प्रचलित आहे.

तरवा लावल्याने वृक्षांच्या फांद्या दरवर्षी छाटल्या जात आहेत. यामुळे वृक्षांची वाढ खुंटत आहे. शिवाय परिसर रुक्ष होत आहे. झाडांच्या फांद्या नष्ट होत असल्याने ऐन कडक उन्हात सावली देखील नष्ट होते. तरवा लावणीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघतात. या धुराने तरवा लावणार्‍या शेतकर्‍याला त्रास होतोच शिवाय वातावरणात देखील बदल होतो. अनेकदा या तरवा लावणीतून वणवा लागण्याचे प्रकार देखील होतात. यामुळे पर्यावरणाचा देखील र्‍हास होत आहे. या तरवा लावणीमुळे शेतकरी आपला वेळ आणि श्रम फुकट घालवत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भात पीक घेताना तरवा न लावताच शेती करणे शक्य असल्याचे विज्ञानाने स्पष्ट केले आहे. शिवाय रायगडामध्येच काही भागात तरवा लावला जातो. अन्य भागात मात्र अशा प्रकारे शेती केली जात नाही, मात्र तरी देखील भात पीक उत्तम येत आहे. असे असताना देखील कोकणातील काही भागात आजही तरवा भाजणी केली जाते. कृषी विभागामार्फत गेली काही वर्ष कर्जत येथील चंद्रशेखर भडसावळे यांच्या कल्पकतेतून तयार केलेल्या चारसूत्री भात लावणीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शेतकर्‍यांना याबाबत मार्गदर्शन करून भात पीक लागवड करण्याबाबत प्रेरित केले जाते, मात्र तरीदेखील शेतकरी आपली पारंपरिक शेती पद्धत सोडण्यास तयार नसल्याने वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाया जात

आहे. शिवाय पर्यावरणाची मोठी हानीदेखील होत आहे.

-महेश शिंदे

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply