चौकार, षटकारांचा वर्षाव
मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचे धडाकेबाज फलंदाज आता चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलपूर्वी होणार्या बीसीसीआयच्या एका स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज इशान किशनने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावरच 142 धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघानेही या वेळी आपल्या खेळाडूचे या धडाकेबाज फलंदाजीनंतर कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज असलेला इशान किशन सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. इशान हा झारखंडच्या संघाचा कर्णधारही आहे. इशानने शनिवारी मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात फक्त 94 चेंडूंत 19 चौकार आणि 11 षटकारांच्या जोरावर 173 धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्यामुळे झारखंडच्या संघाला 50 षटकांत तब्बल 422 धावांचा डोंगर उभारता आला आहे. इशानने ही खेळी साकारून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर होणार आहे. त्याच़बरोबर टी-20 विश्वचषकही या वेळी भारतामध्येच खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या जेतेपदामध्येही इशानचा मोठा वाटा होता. कारण गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये इशानने सर्वाधिक 29 षटकार लगावले होते. इशानने गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये 145.76च्या सरासरीने 516 धावा केल्या होत्या. इशान हा झारखंडचा कर्णधार आहे. त्याचबरोबर सलामीवीराची भूमिकाही तोच पार पाडतो. त्याचबरोबर यष्टीरक्षणाची जबाबदारीही त्याच्याकडे आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील सर्वाधिक धावांच्या यादीत आता इशानचेही नाव आले आहे. इशान यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये संजू सॅमसन अव्वल स्थानावर आहे. संजूने या स्पर्धेत नाबाद 212 धावांची झकास खेळी साकारली होती.
झारखंडची सुरुवात चांगली झाली नाही, पण त्यानंतर इशानने दमदार फलंदाजी करीत गोलंदाजांना आपल्यासमोर लोटांगण घालायला भाग पाडले. इशानने या वेळी सर्व गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. त्याचबरोबर मैदानात चौफेर फटकेबाजी करीत त्याने धमाकेदार दीडशतकही झळकावले, पण या वेळी द्विशतक रचण्याची त्याची संधी मात्र हुकली.