भारतीय बंदरांना मिळणार आंतरराष्ट्रीय सहकार्य
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
येत्या 2 ते 4 मार्चदरम्यान मेरीटाइम इंडिया समिट 2021 होणार असून, या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून हे आभासी शिखर संमेलन होत असून, यात भारतीय सागरी क्षेत्रातील व्यवसायाच्या संभाव्य संधींचा आणि आत्मनिर्भर भारतासाठी सागरी क्षेत्राच्या योगदानाचा आढावा घेतला जाणार आहे.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेरीटाइम इंडिया व्हिजन 2030चे प्रकाशन करण्यात येईल. त्याचबरोबर सागरमाला-सागरतट समृद्धी योजना, अर्थ गंगा कार्यक्रम, राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल (सागरी) आदी प्रकल्पांचा शुभारंभदेखील करण्यात येईल. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते गुंतवणूकक्षम प्रकल्पांचे संयोजनचेदेखील प्रकाशन केले जाणार आहे, तसेच भारतात व्यापारी जहाजांना प्रोत्साहन देण्यासाठी एका योजनेचा शुभारंभ करण्यात येईल.