कर्जत : प्रतिनिधी
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले मोबाईल चोरी प्रकरणातील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.
रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी या दोन्ही गुन्ह्याचा तपास केला.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सदर चोरीस गेलेल्या मोबाईलचा व आरोपींचा शोध घेणे कामी कर्जत पोलिस ठाण्यांमध्ये विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्या अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 141/ 2019 भा.द.वि कलम 379 चोरीस गेलेला मोबाईलचा सायबर सेल शाखा अलिबाग यांची मदत घेऊन तपास केला असता मोबाईल हा कर्जत परिसरात ऍक्टिव्ह असल्याने सदर मोबाईल धारकास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा इसम कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगांव येथे राहणारा असून त्याचे नाव रुपेश अरुण कदम आहे. त्याने सदरचा गुन्हा कबूल केला असून सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
दुसरा गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2020 भा.द.वि कलम 379 मधील चोरीस गेलेला मोबाईलचा सायबर सेल शाखा अलिबाग यांची मदत घेऊन ट्रेस केला असतात सदरचा मोबाईल हा बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ऍक्टिव्ह असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. कर्जत पोलिस ठाण्याचे पथक वरिष्ठांच्या आदेशाने बीड येथे रवाना झाले सदर मोबाईल धारक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राहणारा विजय भीमराव सोलंकी असल्याचं उघड झाले. सोलंकी याने सदरचा गुन्हा केल्याचा कबूल केले, याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याच्याकडून गुन्ह्यातील 10 हजार किंमतीचा मोबाईल जप्त केला. कर्जत पोलीस ठाण्यात मधील दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यात अलिबाग सायबर सेल मधील पोलीस अंमलदार अक्षय पाटील यांची मदत मिळाली.