Breaking News

सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र. 1ची संयुक्त पाहणी

प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

 सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महा मेट्रोकडून मंगळवारी (दि. 23) प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्यासह सिडको व महा मेट्रोतील अभियंत्यांनी मेट्रो प्रकल्प स्थळाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला.

प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे. नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 कि.मी. च्या 11 स्थानकांसह तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

परंतु सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणार्‍या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-19 मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून सिडकोने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वांत योग्य पर्याय म्हणून महा मेट्रोची निवड करण्यात येऊन या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे. महा मेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. यामुळे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरिता महा मेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.

महा मेट्रोने या तज्ज्ञ गटाच्या मदतीने विविध उपक्रमांना प्रारंभ केला आहे. या तज्ज्ञ गटाकरिता तळोजा मेट्रो आगार येथे कार्यालयासाठी जागाही सिडकोकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्र. 1 वरील स्थानक 7 ते 11 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2021 अखेरीस आणि स्थानक 1 ते 7 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2022 अखेरीस वाणिज्यिक परिचालनास (प्रवासी वाहतुकीस) सुरुवात होणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply