लंडन : वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात निर्णायक क्षणी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. धोनी धावबाद झाल्याने सामन्याला शेवटच्या क्षणी कलाटणी मिळाली असे मत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यानंतर व्यक्त केले, मात्र आमचे नशीब बलवत्तर असल्याने तो चेंडू स्टंपला लागला, असे मत गप्टिलने व्यक्त केले आहे.
रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर शेवटच्या 10 चेंडूंमध्ये भारताला विजयासाठी 25 धावांची आवश्यकता होती. फलंदाजी करणार्या धोनीने डीप फाइन लेगला चेंडू टोलवला आणि त्याने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गप्टिलने चेंडूवर झेप घेत एक स्टंप दिसत असतानाही अचूक फेकी करत धोनीला धावबाद केले. अवघ्या काही सेंटीमीटर अंतराने धोनी बाद झाला. धोनीला धावबाद करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गप्टिल म्हणाला, चेंडूची गती खूपच संथ झाली होती. त्यामुळेच मी जितक्या जलद धावत जाऊन तो पकडता येईल असा प्रयत्न करीत तो चेंडू उचलला आणि थेट स्टंपच्या दिशेने फेकला. तो अगदी सरळ जाऊन स्टंपला लागला. आमचे नशीब होते की त्या चेंडूने थेट स्टंपचा वेध घेतला. आमच्यासाठी तो क्षण निर्णायक ठरला.