इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारतात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वक्तव्य केले आहे. जर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत आल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे, मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शांततेच्या मुद्द्यावर चर्चा करणे अशक्य असून ते पाकसोबत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यापासून मागे हटू शकतात, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. यानंतर बदल्याची कारवाई म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केले. त्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा हल्ला परतावून लावण्यात आला. यामुळे गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांदरम्यान संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
परदेशी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान यांनी म्हटले आहे की, भाजप सरकार सत्तेत आल्यास काश्मीर मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो. मी कधीही विचार केला नव्हता की सध्या भारतात काय घडत आहे, हे मी पाहणार. मुस्लीम विचारधारेवर हल्ले होत आहेत. अनेक वर्षापूर्वी भारतीय मुस्लीम आपल्या स्थितीविषयी खूश होते, मात्र आज ते कट्टर हिंदू राष्ट्रवादामुळे चिंतीत आहेत, असेही खान यांनी म्हटले आहे.
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याप्रमाणे मोदीदेखील एकीकडे भीती आणि राष्ट्रवादाची भावना जागवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच पाकिस्तान आपल्या जमिनीवरील दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्तेत आले होते. त्या वेळी त्यांनी सैन्याच्या ताकदीने काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढू शकत नाही, असे म्हटले होते. आता पुन्हा त्यांनी काश्मीर प्रश्नावर चर्चेचा सूर व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर भारत-पाकिस्तान या दोन देशांतील संबंध सुधारतील. शांततेवर चर्चा करणं शक्य होईल, असं इम्रान खान म्हणाले. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीनं काँग्रेस पक्ष शांततेवर चर्चा करणार नाही. -इम्रान खान, पाकचे पंतप्रधान