अगोटच्या बेगमीमुळे मागणीत वाढ, बाजारात आवक मात्र कमी
पाली : प्रतिनिधी
कोकणात सुक्या व ओल्या मासळीची वेगळीच क्रेज आहे. सुकी मासळी साठवण करण्यासाठी महिला अधिक आग्रही असतात. त्यातही पावसाळा जवळ आला असल्याने रायगड जिल्ह्यात अगोटीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढली आहे. मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत. मागील महिन्यात चारशे रुपये किलोने मिळणारे सुके बोंबील आता आता सहाशे ते सातशे रुपये किलो झाले आहेत. सोडे, माकूल अशा सुक्या मासळीचे भाव तर खूप वाढले आहेत. जूनपासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने मांसाहारी खाणार्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. मात्र सध्या मासळीचा पडलेला दुष्काळ, कमी प्रमाणात मासे मिळणे व मासळीची आवक कमी यामुळे सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत. अगोटीमुळे सध्या आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरु आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते. आणि त्यांचे भावदेखील वधारतात अशा वेळी घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी काढली की मग जेवण चांगले जाते. सध्या समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत आहे. सापडलेली मासळी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी आधीच कमी मग सुकविण्यासाठी कशी उरणार, त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवित आहेत, असे पालीतील मासळी विक्रेत्या गौरी मनोरे यांनी सांगितले. त्यातच डिझेलचे व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. मासळीची आवक कमी झाल्याने सुकवलेली सुरमई व पापलेट, माकुल हे महागातले मासे तर बाजारातून गायबच झाले आहेत.
मागील महिन्याच्या तुलनेत आत्ता सुक्या मासळीचे भाव खुप वाढले आहेत. अगोटी असल्याने खवय्ये अधिक प्रमाणात सुकी मासळी खरेदी करतात, मात्र भाव खूपच वाढल्याने ठराविक सुकी मासळी कमी प्रमाणात विकण्यासाठी ठेवतो.
-सरफराज पानसरे, सुकी मासळी विक्रेते, पाली
सुक्या मासळीचे प्रतिकिलो भाव
प्रकार : सध्या : मार्च
साधे सोडे : 1600 रुपये, : 1200 रुपये
उच्च दर्जाचे सोडे : 2000 ते 2200 रु. : 1800 रु.
अंबाडी : 500 रुपये, : 400 रुपये
सुकट : 250 रुपये, : 200 रुपये
बोंबील : 600 ते 700 रु. : 400 रुपये
माकुल : 600 रुपये, : 500 रुपये
वाकटी : 400 रुपये, : 300 रुपये
मांदेली : 250 रुपये, : 200 रुपये
मासे सुकट (खारे) : 400 रुपये : 300 रुपये
रेपटी : 250 रुपये, : 200 रुपये
बांगडा : 10 ते 15 रु : 20 रुपये
(एक नग) (3 किंवा 4 नग)