Breaking News

लालूप्रसाद यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

पाटणा : वृत्तसंस्था

चारा घोटाळाप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले असून त्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. गेले 24 महिने ते तुरुंगात आहेत. लालूप्रसादांच्या जामिनाची मागणी करणार्‍या अर्जाला फेटाळताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केले आहे की, 14 वर्षांच्या शिक्षेच्या तुलनेत तुरुंगात काढलेले 24 महिने नगण्य आहेत. विशेष म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या जामिनाची मागणी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला होता की, कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल हस्तगत झाला नव्हता, मुख्य गुन्हा हा फक्त कट रचल्याचा होता. यावर खंडपीठानं असं स्पष्ट केलं की खटल्याचं मूल्यमापन करण्याचं काम उच्च न्यायालयाचं आहे. आमचं काम या क्षणी फक्त जामीन अर्जाचा विचार करणं आहे, असंही खंडपीठानं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागानं लालूप्रसादांच्या जामिनाला जोरदार विरोध केला. आजारी असलेले लालूप्रसाद यादव आता लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी तंदुरुस्त कसे झाले, असा सवाल विचारत सीबीआयनं जामीन देण्यास विरोध केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत लालूप्रसाद यादव तुरुंगातच राहतील हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी केलेला गुन्हा, त्यासंदर्भातली शिक्षा आदी बाबी उच्च न्यायालय बघेल, असं न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केलं आहे. यामुळे ते हादरले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply