मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळ असणार्या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात जाणवला. पर्यटक येत नसल्याने सर्वच धंदे बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडेफार पर्यटक बाहेर फिरायला येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिक स्थळांना परवानगी नसल्याने ही ठिकाणे बंदच ठेवण्यात आली आहेत. मुरूडमधील सुप्रसिद्ध जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे येथील बोट चालक-मालक चिंतेत आहेत. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठीच्या 33 शिडाच्या बोटी त्याचप्रमाणे मशिन बोट मार्चपासून एकाच जागी आहेत. एकेकाळी गजबजणारे राजपुरी व खोरा बंदर सुनेसुने झाले असून या ठिकाणी निरव शांतता दिसून येत आहे. पूर्वी शनिवार-रविवारी या दोन्ही जेट्ट्यांवर मोठी गर्दी असायची, परंतु आता येथे कोणीही फिरकत नसल्याने सन्नाटा पसरला आहे. बोटींची रेलचेल, ऑटो रिक्षा, टांगास्वारी, शहाळी, सरबत, टोपी व गॉगल विक्रेते दिसेनासे झाले आहेत. फक्त शांतता असून एकेकाळी शेकडोंच्या संख्येने असणारी वर्दळ आता शांत झाली असून पुन्हा ते दिवस कधी येतील याची प्रतीक्षा स्थानिक धंदेवाल्यांना आहे. लवकरात लवकर संचारबंदी हटावी आणि पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत अशी येथील स्थानिक लोकांची इच्छा आहे. खोरा बंदरातून जंजिरा किल्ल्यावर बोटीद्वारे वाहतूक केली जात होती, परंतु आता सदरची वाहतूक व किल्ला बंद असल्याने या भागात नीरव शांतता पसरली आहे.