दशरथ पाटील यांचा इशारा; सर्वपक्षीय नेत्यांची घेणार भेट
पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा जनइशारा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सल्लागार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींची भेट घेणार आहोत, अशी माहिती अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.
या वेळी अखिल आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, उपाध्यक्ष मधुकर भोईर, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सल्लागार अॅड. पी. सी. पाटील, सहचिटणीस डी. बी. पाटील, खजिनदार जयवंत तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी दि. बा. पाटील यांनी 1984 साली पुकारलेले शौर्यशाली, गौरवशाली आंदोलन देशभर गाजले. या संघर्षात पाच जण शहीद झाले. या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे तत्त्व मान्य झाले आणि हे प्रेरणादायी उदाहरण महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसाठीही लागू झाले. यामुळेच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची दखल घेणारी स्मृती चिरकाल टिकवावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, भूमिपुत्र, ग्रामस्थ, कष्टकरी जनता, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना करीत आहेत. लोकसमूहाची ही भावना राज्यातील महाविकास आघाडीचे सल्लागार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांना भेटून त्यांच्या दृष्टिपथास आणणार आहोत, असे दशरथ पाटील यांनी म्हटले.
प्रकल्पग्रस्तांच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अचानक नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व कष्टकरी जनतेत नाराजी व असंतोष पसरला आहे. खरंतर बाळासाहेबांबद्दल सर्वांनाच आदर आहे. बाळासाहेबांचे नाव मोठ्या प्रकल्पांना देता येईल किंवा दिलेही जात आहे, पण नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ व कष्टकरी जनता आदी लोकसमूह प्रचंड आग्रही आहे. सर्व घटकातील जनतेची ही संवेदनशील भावना लक्षात घ्यावी; अन्यथा यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही मान्यवर नेत्यांना या भेटीत दिला जाणार असल्याचे दशरथ पाटील यांनी स्पष्ट केले.