
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील मांडवणे ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी गावात रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या परिसरात विविध जातींचे विषारी साप आढळतात. अनेकदा शाळेच्या आवारात व वर्गंखोल्यांतही विषारी साप दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवास धोका होण्याची शक्यता आहे. याविषयी शालेय केद्रप्रमुखांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पालकांत नाराजीचा सूर आहे. फणसवाडी राजिप शाळेला लागून भातशेती व पडीक जमीन आहे. शाळेच्या दरवाजांवर, खिडक्यांवर, कपाटाखाली, बेंचवर, खडुच्या बॉक्समध्ये, किचनमध्ये, शौचालयात वारंवार मण्यार जातीचे साप दिसून येतात. त्यामुळे या शाळेत भितीयुक्त वातावरण असून विद्यार्थी, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या सापांचा धोका टाळण्यासाठी शाळेकडून काळजी घेतली जाते. मात्र परंतु विद्यार्थ्यांना शिकवत असताना अचानक साप वर्गखोलीच्या आवारात येत असल्याने खळबळ उडत आहे. फणसवाडी शाळेत विषारी सापांचा वावर असल्याचे लेखी पत्र केद्रप्रमुखांनी कर्जतचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्यांना दिले आहे. मात्र त्याकडे दुर्लंक्ष होत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण मिळणार का? असा सवाल केला जात आहे.