पनवेल : वार्ताहर
हायवे मृत्युंजयदूत ही योजना अपर पोलीस महासंचालक, वाहतुक भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून उदयास आली. पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे हायवे मृत्युंजयदूत योजना पोलीस अधीक्षक, रायगड परीक्षेत्र संजय बारकुंड, पोलीस उप अधीक्षक संदीप भागडीकर, पोलीस निरीक्षक पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी हायवे मृत्युंजयदूत हा उपक्रम सोमवारी (दि. 1) महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे सुरू करण्यात आला आहे. महामार्गावर होणार्या अपघातामध्ये त्यातील जखमींना तातडीचे उपचार मिळण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले की, त्याकरिता हायवे लगतच्या गावातील, मॉल, पेट्रोल पंप या ठिकाणच्या नागरिकांचा महत्त्वाच्या ठिकाणी चार, पाच जणांचा एक गट बनवून त्यांना ओळखपत्र दिले जाईल. अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागणार नाही. अपघातग्रस्तांना कसे हाताळावे, तातडीने प्रथोमपचार कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपघात घडल्यानंतर जो वेळ असतो त्याला गोल्डन अवर म्हणतात. अपघाताच्या वेळी काय केले पाहिजे, वेळेत जखमींना हॉस्पिटलमध्ये कसे पाठवावे याचे योग्य प्रशिक्षण हायवे मृत्युंजय दूतांना देण्यात येणार आहे. तसेच हायवे मृत्युंजयदूत यांना ओळखपत्र देण्यात येणार असून चांगले कर्तव्य बजावल्यास प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेल्या अॅवॉर्डसाठी चांगले काम केलेल्या देवदुतांची नावे पाठविण्यात येतील. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप संचालक गुरूनाथ साटेलकर म्हणाले की, महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ मदत केली पाहिजे. एक जखमीचा जीव वाचविला तर संपूर्ण कुटुंब वाचविल्यासारखे असते. तसेच आम्ही गेली 15 वर्षे महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम करीत आहोत. आज या योजनेने खूप समाधान वाटले. देशात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी दीड लाख नागरीक जीव गमावतात. महाराष्ट्र राज्यात त्याचे प्रमाण सरासरी 12 हजार आहे. अपघातामध्ये अनेकांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने जिवाला मुकावे लागले आहे. प्रत्येक गटाला एक स्ट्रेचर व ’फर्स्ट एड’ चे साहित्य पुरविण्यात येईल. त्यांना महामार्गावर 108 क्रमांकाची रुग्णवाहिका, खाजगी रुग्णवाहिका तसेच रुग्णालयांची माहिती त्यांचे फोन नंबर उपलब्ध करून देण्यात येतील, जेणेकरून त्यांना जखमींना तातडीच्या वैद्यकिय उपचारांकरीता ’गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहचविता येईल. या वेळी डॉ. शेख आयआरबी यांनी जखमींना कशाप्रकारे स्ट्रेचरवरून घेवून जाता येईल व प्रथमोपचार याची प्रात्यक्षिके दाखविली. या कार्यक्रमाकरिता अपघातग्रस्त पदाधिकारी संघटना गुरूनाथ साटेलकर, डॉ. संदेश गोवारी, डॉ. अक्षय पवार, डॉ. काजोल पडळकर, कसळखंड गावचे सरपंच अनिल पाटील, अमोल कदम, गणेश पाटील, बोरले आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरीता देवदूत, आयआरबी व आजूबाजूच्या गावातील मोठ्या प्रमाणात देवदूत उपस्थित होते.