कर्जत : बातमीदार
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जतमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जतचा राज्यात बोलबाला झाला पाहिजे यासाठी नगर परिषदेने जोरदार तयारी केली आहे.
कर्जत नगर परिषद माझी वसुंधरा अभियान 2021 मध्ये सहभागी झाली असून नगर परिषदेने शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ’आपले शहर हरित शहर’ ही संकल्पना राबविली आहे. त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना हरित शपथ देण्यात आली. माझी वसुंधरा या अभियानाची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी आणि नागरिकांनी या अभियानात शंभर टक्के योगदान द्यावे, यासाठी शहरातील चौकाचौकात आणि भिंतींवर माझी वसुंधरा अभियानाची माहिती देणारे भित्तीचित्रे रंगविण्यात आली आहेत. त्यातून आपली वसुंधरा वाचविण्यासाठी प्रबोधन करण्याचा हेतू असल्याची माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उप नगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली. कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून पर्यवरण बचाव आणि माझी वसुंधरा बचाव यांची जनजागृती करण्यासाठी सायकल फेरी काढण्यात आली होती. या फेरीत नागरिक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. तर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील प्रत्येक महिलेच्या हातात तुळशीचे रोप देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, तो शहरातील सर्व नऊ प्रभागात राबविला जाणार आहे.
कर्जत शहरातील सर्व 18 नगरसेवकांकडून यांच्या प्रभागात नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या पथनाट्यातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच माझी वसुंधरा अभियानामध्ये उल्हास नदी संवर्धन कार्यक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिली.