कडाव : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील चिंचवली-सालवड-नसरापूर हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आवस्थेत असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, खडी वर आली आहे. प्रवासादरम्यान उडणार्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाच्या त्रास होऊ लागला आहे.
चिंचवली-सालवड-नसरापूर या मार्गाची दूरावस्था झाली आहे. जागोजाग छोटेमोठे खड्डे पडले असून, खडी आणि धुळीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी वाहने वारंवार नादुरुस्त होत आहेत. तर प्रवासी पाठदुखी, कंबरदुखी तसेच श्वसनाच्या विकाराने हैराण झाले आहेत. प्रवाशांची गरज ओळखून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष त्वरीत द्यावे, अशी मागणी या परिसरात जोर धरू लागली आहे.