खोपोली : प्रतिनिधी
कोरोना आणि बर्ड फ्लू संसर्गाच्या भीतीने नागरिक आधीच त्रस्त आहेत. मात्र चौक (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत पोल्ट्रीचा शिल्लक कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रंचड दुर्गंधी पसरली असून, रोगराईची शक्यता वाढली आहे.
मुंबई – पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील चौक गाव वसलेल आहे. मोठी बाजारपेठ म्हणून चौक गाव विकसित होत आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत आहे. चौक ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये चिकनचा शिल्लक कचरा, पिसे, आतडीदेखील टाकण्यात येत असल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा रात्रीच्या वेळेस टाकण्यात येत असल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली असून, ग्रामपंचायतीने लक्ष घालून तेथे सफाई मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
चौक गावाच्या हद्दीतील महामार्गाजवळ चिकनचा शिल्लक कचरा टाकण्यात येत असून, तेथून जाताना नाक मुठीत धरावे लागते. या ठिकाणापासून काही अंतरावर एसटी बस थांबा असून, दुर्गंधीमुळे तेथे उभे रहाणेदेखील नकोस वाटते. या ठिकाणी चिकनचा शिल्लक कचरा टाकण्यावर कडक कारवाईची गरज आहे.
-विश्वनाथ मते, ग्रामस्थ, तारापूर, चौक, ता. खालापूर