Breaking News

पालीत माकडांचा उच्छाद; नागरिक त्रस्त

सुधागड : प्रतिनिधी
अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीमध्ये माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून या माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पालीकर करीत आहेत.
पाली बाजारपेठ, मधली आळी, खडक आळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगर आळी अशा सर्वच गजबजलेल्या भागात माकडे नित्यनेम धुमाकूळ घालत आहेत. ही माकडे छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडतात. ड्रेनेजचे पाईप, विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले सामान, पाण्याच्या टाक्या, झाडे व कुंड्या यांचे अतोनात नुकसान करीत आहेत.
माकडांमुळे घराबाहेर कोणत्याही गोष्टींचे वाळवण घालता येत नाही. इतकेच नव्हे तर घराची दारे, खिडक्या उघड्या ठेवणेही अवघड झाले आहे. घरात शिरून माकडे अन्नधान्य, भाजीपाला यांची नासाडी करतात. वाळत घातलेले कपडेदेखील फाडून टाकतात. त्यामुळे मोठी आर्थिक हानी होत आहे. अनेकदा ही माकडे वाहनांवरदेखील उड्या मारतात, तर कधी टेरेसच्या पत्र्यावर धुडगूस घालतात. त्यामुळे या माकडांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply