कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवून टँकर सुरू केले जातात. टँकरमाफियांची निर्माण झालेली साखळी व त्यांना पोसण्यासाठी कर्जत पंचायत समिती काम करीत असल्याचा आरोप खुद्द विद्यमान सदस्यांनीच केला आहे.दरम्यान, मागील वर्षात कोणत्याही नळपाणी योजनांवर पंचायत समितीने 15वा वित्त आयोग किंवा सेसचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे नळपाणी योजना आहेत त्या स्थितीत असून पाणीपुरवठ्यासंबंधी नवीन योजना राबविल्या गेल्या नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागले. प्रत्येक पंचायत समिती सदस्याला सेसचा निधी द्यावा, असे रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे आदेश आहेत, मात्र कर्जत पंचायत समितीमध्ये हा निधी वर्ग करणार्या संबंधित अधिकार्यांनी 15व्या वित्त आयोगातील निधीचे वाटप सर्व पंचायत समिती सदस्यांना नियोजन करून केले नाही. त्यामुळे आदिवासी भागात पाणीपुरवठ्यासंबंधीची कामे मागील वर्षभरात वेळेवर करता आली नाहीत, असा आरोप पंचायत समिती सदस्य जयवंती हिंदोळा यांनी केला आहे. 15व्या वित्त आयोगाचा निधी प्रामुख्याने पाणीपुरवठ्यावर खर्च करावा, अशी सूचना असताना मागील वर्षात कर्जत पंचायत समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आदिवासी वाड्या आपल्या नादुरुस्त नळपाणी योजनेच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर सातत्याने पाणीटंचाई अनुभवणार्या आदिवासी वाड्या नळपाणी योजनेच्या व पाणी पर्याय वाढवून देण्यासाठी आवश्यक निधीच्या मागे लागल्या होत्या, मात्र मागील वर्षात कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून नळपाणी योजनांची दुरुस्ती झाली नाही किंवा नळपाणी योजनांवर कामही झाले नाही. पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व्हावी, असे सदस्य ओरडून सांगत असूनही कर्जत पंचायत समितीचे प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांना कोणतीही किंमत कर्जत पंचायत समितीमध्ये राहिली नाही, असा आरोपही विरोधी पक्षाचे सदस्य करीत आहेत.पाणीटंचाईग्रस्त भागातील आदिवासी वाड्या, पाडे या ठिकाणी सेसचा निधी खर्च करून नळपाणी योजना सुस्थितीत आणाव्यात, अशी सदस्य पंचायत समितीत मागणी करतात, पण कर्जत पंचायत समितीच्या एकाधिकारपणामुळे सेसचा पंचायत समिती सदस्यांचा हक्काचा निधी शाळा दुरुस्तीवर खर्च केला जात आहे. हे आदिवासी व पाणीटंचाईग्रस्त भागासाठी अन्यायकारक असल्याचे जयवंती हिंदोळा यांनी कर्जत पंचायत समितीतील सत्ताधारी गटावर तोफ डागताना सांगितले. पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना सेस निधीचे समांतर वाटप करणे ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लेखी पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना कळविली आहे. असे असताना आदेशाची अंमलबजावणी न करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी भागातील पंचायत समिती सदस्य हिंदोळा यांनी केली आहे. दुसरीकडे सर्वत्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. मग मागील वर्षात पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकही रुपयाही खर्च न करणार्या कर्जत पंचायत समितीमधील पदाधिकारी-अधिकारी हे आदिवासी आणि दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी आम्हाला टँकरने व तेही चार दिवसांतून एकदाच पाणी पाठवले जाणार आहे काय, आमच्यासाठी चांगली पाणी योजना शासन राबविणार आहे की नाही, असा सवाल कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत पंचायत समितीने मागील वर्षी 2020मध्ये 25 आदिवासी वाड्या आणि सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे. या वर्षीदेखील पाणीटंचाईग्रस्त वाड्या आणि गावांना टँकरने पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती