आजी-माजी सैनिकांचे जिल्हाधिकार्यांना साकडे
अलिबाग : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचीत आहे. फौजी आंबवडेमधील आजीमाजी सैनिकांनी शुक्रवारी (दि. 22) रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेवून त्यांना आपल्या गावातील समस्या दूर करण्याबाबत साकडे घातले.फौजी आंबवडे गावाला सुमारे 250 वर्षांची सैनिकी परंपरा आहे. आजदेखील गावातील अनेक तरूण देशाच्या सीमेवर देश रक्षणासाठी तैनात आहेत. पहिल्या महायुध्दात गावातील 111 जवानांनी भाग घेतला होता. त्यातील 6 जवान शहीद झाले होते. दुसरे महायुध्द, 1962 चे भारत चीन युध्द, 1965 चे भारत पाक युध्दातही गावातील सैनिकांनी प्राणांची बाजी लावली. यात गावचे सुभेदार रघुनाथ कदम हे शहीद झाले होते.फौजी आंबवडे हे 12 वाडयांचे गाव आहे. शिवाय छोट्या 11 पोटवाड्यादेखील आहेत. गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाड्यांना जोडणार्या छोट्या रस्त्यांवर साकव नाहीत, त्यामुळे पावसाळयात या वाड्यांचा संपर्क तुटतो. गावाची पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील गंभीर आहे. गावातील आरोग्य सुविधा आजारी आहे. शहीद सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचीही दुरवस्था झाली आहे. अशा विविध समस्या या गावाला भेडसावत आहेत. आजीमाजी सैनिकांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन गावातील समस्यांसदर्भात चर्चा केली व मागण्याचं निवेदन सादर केले.23 वाड्यांच्या या गावात रस्त्यांची दूरवस्था आहे. सडवली मार्गे येणारा रस्ता सडवली गावापर्यंतच पूर्ण झाला पुढे फौजी आंबवडे गावापर्यंतचा रस्ता झालाच नाही. या रस्त्याचे काम झाल्यास शिरवली, पांगारी, विन्हेरे, रावतळी, फाळकेवाडी, ताम्हाणे, कावळे, कुंभार्डे वाडी ही गावे फौजी आंबवडे गावाच्या संपर्कात येतील. जलवाहिन्या गंजल्या असून, त्यातून येणार्या पाण्यामुळे रोगराई, आजार उदभवू शकतात. गावात आरोग्य उपकेंद्राची इमारत आहे, परंतु तेथे डॉक्टर्स किंवा परिचारिकांची नियुक्ती केली जात नाही. छोट्या मोठ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी थेट 24 किलोमीटरवर असलेले महाडला जावे लागते.
आमच्या गावच्या प्राथमिक सुविधांसदर्भात संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला, मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकार्यांकडे आलो. जिल्हाधिकार्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. संबंधित समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले आहे.
-काशिनाथ पवार, अध्यक्ष, आजीमाजी सैनिक संघटना, फौजी आंबवडे