Breaking News

पृथ्वी शॉकडून सौराष्ट्रच्या गोलंदाजांची धुलाई

अहमदाबाद ः वृत्तसंस्था
विजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धेत मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ याचा फॉर्म दमदारच सुरू आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम नाबाद 227 धावांची खेळी करण्याचा विक्रम करणार्‍या पृथ्वीने मंगळवारी
(दि. 9) उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रच्या गोलंदाजांची धुलाई केली.
सौराष्ट्राच्या 5 बाद 284 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने एकट्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्याने 67 चेंडूंत शतक पूर्ण केले व नाबाद 184 धावांची खेळी करताना मुंबईला नऊ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मुंबईने 41.3 षटकांत 1 बाद 284 धावा करून सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रकडून समर्थ व्यास (90), चिराग जानी (53) आणि विश्वराजसिंग जडेजा (53) यांनी अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर अवी बरोट व स्नेल पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु त्यांना अनुक्रमे 37 व 30 धावांच्या वैयक्तिक खेळीवर माघारी जावे लागले. प्रेरक मांकड ( 4) व अर्पित वसावडा (10) माघारी परतल्यानंतर जडेजा व व्यास यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर जानीने डाव सावरला आणि संघाला 5 बाद 284 धावांपर्यंत समाधानकारक मजल मारून दिली. मुंबईच्या शाम्स मुलानीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
यानंतर फलंदाजीला आलेल्या पृथ्वी शॉ व यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांनी सौराष्ट्रच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 238 धावांची विक्रमी भागीदारी केली. यशस्वी 104 चेंडूंत 10 चौकार व एक षटकार खेचून 75 धावांवर माघारी परतला, तर पृथ्वीने 123 चेंडूंत नाबाद 185 धावा ठोकल्या. मुंबईसमोर उपांत्य फेरीत कर्नाटकचे आव्हान असणार आहे. 11 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल.
पृथ्वीच्या नाबाद 185 धावांच्या खेळीने महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी धोनीने 2005मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 आणि कोहलीने 2012मध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावा केल्या होत्या.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply