महाविकास आघाडी सरकारमधील सावळा गोंधळ आजवर इतक्या वेळा जनतेसमोर आला आहे की महाराष्ट्राच्या जनतेला त्याची जणु सवयच झाली आहे. तीन पक्षांचे हे बिघाडी सरकार भल्याबुर्या मार्गांनी सत्तेवर आले, त्याला आता दीड वर्ष उलटेल. या दीड वर्षामध्ये असा एकही महिना नसेल की त्यामध्ये सरकारमधील सावळ्या गोंधळाचे उदाहरण सापडू नये. या गोंधळ मालिकेतील ताजे उदाहरण म्हणजे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घाईघाईने केलेली लॉकडाऊन उठवण्याची घोषणा. या घोषणेसाठी ते इतके उतावीळ का झाले हेच कळत नाही. महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याची सुचिन्हे आता दिसू लागली आहेत. 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे. कशीबशी का होईना पण दुसरी लाट ओसरताना दिसू लागली आहे. यामुळे जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी रोजीरोटीचा प्रश्न मात्र प्रकर्षाने भेडसावतो आहे. अशा परिस्थितीत कडक निर्बंध शिथिल व्हावेत आणि अर्थार्जनाचे मार्ग खुले व्हावेत अशी जनतेची अपेक्षा असणारच, परंतु लॉकडाऊनचे कडक निर्बंध उठवण्याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुळीच घाई नाही. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी मात्र संधी मिळेल तेव्हा पत्रकारांसमोर येऊन अक्षरश: गोंधळ घालतात हे वेळोवेळी दिसले आहे. जी घोषणा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी करणे अपेक्षित आहे, ती अन्य मंत्री परस्पर कशी करतात? या तीन चाकी सरकारमध्ये कुठलाच समन्वय अथवा शिस्त नाही का? पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन उठवण्याच्या संदर्भात तपशीलवार माहिती देत बेधडक घोषणा केली. उद्या म्हणजे शुक्रवारपासूनच काही ठिकाणचे निबर्र्ंध संपूर्णत: उठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगून टाकले. विशेषत: ठाणे आणि नागपूर या शहरांमध्ये कोरोनाची साथ खूपच नियंत्रणात असल्याने तेथील मॉल, उद्याने असे सारे काही उद्यापासूनच उघडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगताच विविध वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज झळकू लागल्या. यानंतर महाविकास आघाडीत प्रचंड गोंधळ उडाला आणि लॉकडाऊन संदर्भातील बातम्या थांबवण्याची विनंती करणारे फोन मुख्यमंत्री कार्यालयाकडून वृत्तवाहिन्यांना गेले. पाठोपाठ कुठलेही निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत, त्यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री योग्य वेळी घोषणा करतील असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आला. या भानगडीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या अब्रुचे खोबरे झाले. विरोधकांनी सरकारच्या सावळ्या गोंधळावर टीकास्त्र सोडलेच, परंतु समाज माध्यमांमधून सामान्य जनतेनेदेखील सरकारची प्रचंड खिल्ली उडवली. अर्थात आपली अब्रु गेल्याची खंत सत्ताधार्यांना वाटत नाही हा भाग निराळा, कारण काहीही झाले तरी आपापल्या खुर्च्या घट्ट पकडून बसायचे हे ठरवूनच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये भांड्याला भांडे लागायचेच अशी हास्यास्पद सारवासारव शिवसेनेचे प्रवक्ते करत आहेत, परंतु बूँद से गयी सो हौद से नहीं आती ही म्हण त्यांना चपखल लागू पडते. महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय नाही आणि समन्वयही नाही. जनतेची कामे करण्याची इच्छाशक्तीही नाही ही वस्तुस्थिती आहे. ताजा सावळागोंधळ त्याचेच द्योतक आहे. असे किती गोंधळ महाराष्ट्राच्या जनतेला भोगावे लागणार आहेत हे आता येणारा काळच ठरवेल.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …