विजय हजारे स्पर्धेत सलग चार शतके
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
बीसीसीआयने आयोजित केलेल्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात 101 धावांची खेळी केली. या शतकासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
या स्पर्धेत देवदत्तने अर्धशतकाने सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या चार सामन्यात त्याने शतक केले. दुसर्या लढतीत त्याने बिहारविरुद्ध 97 धावा केल्या होत्या. त्यानंतर उडिसाविरुद्ध 152, केरळविरुद्ध नाबाद 126, रेल्वेविरुद्ध नाबाद 145 आणि सोमवारी पुन्हा केरळविरुद्ध 101 धावा करून शतकांचा चौकार मारला. या सामन्यात कर्नाटकने 80 धावांनी विजय मिळवला. देवदत्तने सहा सामन्यात 168.25च्या सरासरीने 673 धावा केल्या आहेत. त्यात चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
एका विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतकांच्या बाबत देवदत्तने आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटने 2008-09 साली दिल्लीकडून खेळताना चार शतक केली होती. विशेष म्हणजे देवदत्त आयपीएलमध्ये विराट कोहली नेतृत्व करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. गेल्या वर्षी त्याने आरसीबीकडून धमाकेदार कामगिरी केली होती. आतादेखील तो शानदार फॉर्ममध्ये दिसत असल्याने कोहलीच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे.