अॅटिग्वा ः वृत्तसंस्था
वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिलाच सामना एका वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला आहे. श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिसर्या पंचांनी बाद दिले, त्यावरून वाद सुरू झालाय. ही घटना श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना घडली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 21व्या षटकात वेस्ट इंडिजचा कर्णधार किएरॉन पोलार्ड याने टाकलेल्या एका चेंडूवर धनुष्का गुणतिलका याने बचावात्मक फटका खेळला. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर त्याच्या पायाजवळच होता. त्याचवेळी दुसर्या टोकाला असलेला पथम निसांका याने धाव घेण्याची अॅक्शन केली. त्यावर धनुष्काने एक पाय पुढे टाकला, पण लगेचच धाव घेण्यासाठी नकार दिला. त्यावेळी क्रीजमध्ये परतत असताना त्याचा पाय चेंडूला लागला आणि चेंडू त्याच्या पायासोबत मागे आला. तेव्हा पोलार्ड आणि जवळचे विंडीजचे क्षेत्ररक्षक धावबाद करण्याची संधी शोधत चेंडूच्या दिशेने धावत होते. चेंडू गुणतिलकाच्या पायाला लागून मागे जाताच पोलार्डने मैदानावरील पंचांकडे अपिल केले.पोलार्डच्या अपिलनंतर मैदानावरील पंचांनीही आऊट असा सॉफ्ट सिग्नल दिला आणि तिसर्या पंचांकडे निर्णय सोपवला. रिप्ले बघून तिसर्या पंचांनी क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुणतिलकाला बाद दिले. त्यामुळे गुणतिलकाला मैदानातून बाहेर जावे लागले. त्याने 61 चेंडूंत 55 धावांची महत्त्वाची खेळी केली. या सामन्यात विंडीजने श्रीलंकेवर मात करीत विजय मिळवला. दरम्यान, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर मात्र अनेक क्रिकेटप्रेमींनी धनुष्का नॉट-आऊट असल्याचे सांगत त्याला बाद देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनीही धनुष्काने जाणूनबुजून अडथळा पोहोचवला नाही, अशी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे.