जैवविविधतेसह वृक्षसंपदा जळून खाक
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील खेमवाडी परिसरात लागलेल्या वणव्यात पेंढा, शेतातील राब जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले, शिवाय वृक्षसंपदेला या वनव्याचा मोठा फटका बसला आहे. आदिवासी बांधव व कार्यकर्त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून हा वणवा नियंत्रणात आणला.
सुधागड तालुक्यातील जंगलभाग, माळरान, डोंगर पठारावर वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील खेमवाडी परिसरात लागलेल्या भीषण वणव्याने शेतकर्यांसह ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडवून दिली. या वणव्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. पेंढा, शेतातील राब जळून खाक झाले. शिवाय वृक्षसंपदेला फटका बसला.
वणवे वेगळ्या कारणांनी लागतात. सुकलेले गवत हे पेटोल व डिझेलपेक्षा धोकादायक असते. पेटलेले गवत विझवणे अत्यंत कठीण काम असते. वार्यात वणवा अधिक भडकतो व पसरतो. वनविभाग व तालुका प्रशासनाने वणवे रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार यांनी केली आहे.
वणवे लागण्याची विविध कारणे आहेत. राब भाजताना वार्याने ठिणगी इतरत्र उडून वणवा भडकतो, तसेच शिकारीसाठीदेखील वणवे लावले जातात. वणवे नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. वणवा लागल्याची माहिती मिळाल्यास फायर ब्लो च्या सहाय्याने वन कर्मचारी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवितात. नागरिकांनी वणवे रोखण्यासाठी वनविभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, पाली, ता. सुधागड