पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल आणि कर्जत लोकल रेल्वे जोडणारी नवी रेल्वेलाईन लवकरच कार्यान्वित होणार आहे. तसेच भूसंपादनासाठी 11 कोटींचा निधी केंद्र सरकारने महसूल विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पनवेल ते कर्जत या मार्गावर उसर्ली खूर्द, चिखले, सांगडे, बेलवली, पाली बुद्रुक, भिंगार, भिंगारवाडी, मोहपे, पोयंजे, वारवली, नढाळ, वावराळे, भेरले अशा 11 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. सध्या या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या धावत आहेत. पनवेल-कर्जत लोकल सुरु करण्यासाठी मोरबे येथे असलेल्या बोगद्याच्या अडथळ्यामुळे या रेल्वेचे दुपदरीकरण थांबले होते. मात्र आता नव्या मार्गिकेसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाली असून, हा निधी महसूल प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. दोन उड्डाण पुल, 13 पुलाखालील रस्ते आणि नढाळ ते कर्जत भुयारी मार्ग अशी नव्याने आखणी करुन आता हा मार्ग पुढे नेला जाणार आहे. तसेच असुरक्षित बोगद्याचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूमिसंपादनाची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरु होईल, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात पनवेल-कर्जत रेल्वे धावू शकणार आहे.