Breaking News

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : भारताची द. आफ्रिकेवर मात

रायपूर ः वृत्तसंस्था

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघावर 56 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू युवराज सिंग यांची झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 204 असा धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली.

दक्षिण आफ्रिकेेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले होते. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने जुन्या रंगात येत 37 चेंडूंत 60 धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये नऊ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सचिनने सर्व प्रकारचे फटके मारून दर्शकांचे मनोरंजन केले. बद्रीनाथने 42 धावांचे योगदान दिले. यानंतर युवराज सिंगने सूत्रे हाती घेत आधी सेट होऊन नंतर मोठे फटके लगावले. त्याने 22 चेंडूंत 52 धावा चोपल्या. या खेळीत दोन चौकार आणि सहा षटकार समाविष्ट होते. यातील चार षटकार तर त्याने सलगपणे मारले. युवराज बाद झाल्यानंतर युसुफ पठाण (10 चेंडूंत 22 धावा, प्रत्येकी दोन चौकार व षटकार) आणि मनप्रीत गोनी (एका षटकारानिशी 9 चेंडूंत 16 धावा) यांनी धावफलक वेगाने हालता ठेवत संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. आफ्रिकेकडून सलामीवीर अ‍ॅण्ड्र्यू पट्टिक आणि मॉरन वॅन आणि जॉन्टी र्‍होड्सवगळता कुणीही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अखेर 20 षटकांत 148 धावाच हा संघ करू शकला. भारताकडून युसुफ पठाणने तीन, युवराज सिंगने दोन, तर प्रग्यान ओझा व विनय कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.      

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply