Breaking News

चिमुरड्या देवेनकडून कलावंतीण दुर्गचा सुळका सर

मोहोपाडा : प्रतिनिधी

चौक आसरोटी येथील चार वर्षीय चिमुरड्याने सह्याद्रीचा   अंत्यत थरारक व ट्रेकर्सच्या दृष्टीने अंत्यत कठीण व अवघड समजला जाणारा कलावंतीण दुर्गचा गगनचुंबी सुळका अवघ्या 25 मिनिटांत सर करून अनोखा विक्रम केला आहे. देवेनच्या अनोख्या ट्रेकची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न आहे.

सोमवारी हा ट्रेक यशस्वी झाल्याने देवेनचा सर्वांत लहान ट्रेकर अशीही नोंद होईल, असा विश्वासही रोहिदास ठोंबरे यांनी व्यक्त केला. सोमवारी (दि. 15) देवेन उर्फ श्री या चिमुरड्यांने केलेल्या धाडसी कामगिरीची खालापूर परिसरातच नव्हे राज्यभरातील ट्रेकर्स, क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.

खालापूर तालुक्यातील चौक आसरोटी गावातील चिमुरड्या देवेन रोहिदास ठोंबरे याला वयाच्या 11व्या महिन्यांपासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. या आवडीतूनच त्याने गड किल्ले सर करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत त्याने रायगड, शिवनेरी, सुधागड, लोहगड, विसापूर, माणिकगड, सोंडाई दुर्ग, गणपती घाटातील पदरगड आणि आता नुकताच कलावंतीण दुर्ग सर केला आहे.

अडीच हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा, असा अनेक अंगांनी आव्हानात्मक असणारा हा कलावंतीण दुर्गचा सुळका गिर्यारोहकांना रॅपलिंगद्वारे सर करावा लागतो. त्यामुळेच हा किल्ला सर करणे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नव्हे, पण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका येथील आसरोटी मधील चार वर्षीय चिमुरड्या देवेन रोहिदास ठोंबरे ने तो सर केला आहे.

महाराष्ट्रातील अनेक दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने गडकिल्ल्यांचे संवर्धन केले जाते. नुकतेच कलावंतीण दुर्ग वर राजे प्रतिष्ठान यांचे दुर्गसंवर्धन कार्य सुरू आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन प्रत्येकानेच केले पाहिजे हा संदेश समाजात देण्यासाठी कलावंतीण मोहीम देवेनला घेऊन फत्ते केल्याचे देवेनचे वडील तथा शिवकार्य ट्रेकर्स खालापूर चे संस्थापक रोहिदास ठोंबरे सरांनी सांगितले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी देवेनला त्याचे वडील रोहिदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याची आई रसिका ठोंबरे, महेश दुर्गे, आकाश गोडीवले, रोशन ठोंबरे, केतन भद्रीके, मंदार उतेकर, संचित शिंदे, मंगेश गरुडे, मनीष कदम आणि राजे प्रतिष्ठान पनवेल विभागाचे अध्यक्ष सतीश हातमोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply