Breaking News

बॉल टेम्परिंग प्रकरण पुन्हा तापले

गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी क्लार्क असहमत

सिडनी ः वृत्तसंस्था
2018मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत घडलेले चेंडू फेरफार (बॉल टेम्परिंग) प्रकरण आता चांगले तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेत सँड पेपर लपवणार्‍या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड आणि नॅथन लायन यांनी मैदानात आणल्या जाणार्‍या बाह्य गोष्टीची माहिती नसल्याचे सांगितले होते. आता या प्रतिक्रियेवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने आपले मत दिले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2018मध्ये केपटाऊन येथे झालेल्या तिसर्‍या कसोटीदरम्यान बँक्रॉफ्टने पिवळसर रंगाच्या वस्तूने चेंडूशी फेरफार केली होती. यामागे ऑस्ट्रेलियाचा त्या वेळचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा हात होता. त्यामुळे बँक्रॉफ्टला नऊ महिने, तर स्मिथ आणि वॉर्नर यांना वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते.
क्लार्क म्हणाला, गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी मी सहमत नाही. मी जेव्हा बॅनक्रॉफ्टच्या बाबतीत मत दिले, तेव्हा काही लोकांना याचा त्रास होईल हे मला ठाऊक होते. या चार गोलंदाजांसाठी मी हे वैयक्तिक मत दिलेले नाही. ते माझे मित्र आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि त्या खेळाडूंनी हा संवाद पुढे कसा आला हे पाहिले पाहिजे. गोलंदाजांची प्रतिक्रिया ही फार हुशारीने समोर आणली गेली आहे. मी येथे प्रत्येक शब्दाबद्दल बोलणार नाही. मी जे बोललो ते बोललो. माझा त्यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. मी ज्यावर विश्वास ठेवतो त्याबद्दलच बोललो.
‘त्या’ विधानावरून बँक्रॉफ्टचे घूमजाव
ऑस्ट्रेलियन क्रिकेटला काळिमा फासणार्‍या चेंडू फेरफार प्रकरणासंबंधी सलामीवीर कॅमेरून बँक्रॉफ्टने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत संघातील काही गोलंदाजांचाही समावेश होता, असे विधान बँक्रॉफ्टने केले, मात्र ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने केलेल्या चौकशीत यासंबंधी आपल्याकडे गोलंदाजांच्या सहभागाविषयी कोणताही ठोस पुरावा नसल्याचे बँक्रॉफ्टने स्पष्ट केले आहे.
बँक्रॉफ्ट सध्या इंग्लिश कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत डरहॅम संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान बँक्रॉफ्टने चेंडू फेरफार प्रकरणाविषयी भाष्य केले. निलंबनाच्या काळामुळे क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कोणता बदल झाला या प्रश्नावर उत्तर देताना या घटनेत माझ्यासह वॉर्नर, स्मिथ यांनी चूक मान्य करून पुढाकार घेतल्यामुळे गोलंदाज लपले गेल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे, असे वक्तव्य बँक्रॉफ्टने केले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेने त्वरित चौकशीचे आदेश जाहीर केले. आफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन या गोलंदाजांचा समावेश होता.
‘चेंडू फेरफार प्रकरणाशी निगडित बँक्रॉफ्टशी केलेल्या चर्चेदरम्यान त्याने स्पष्टपणे याविषयी आपल्याला अधिक माहिती नसल्याचे सांगितले. याशिवाय या कारस्थानात गोलंदाजांचा समावेश आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा नसल्याचे बँक्रॉफ्ट म्हणाला,’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या पदाधिकार्‍याने सांगितले. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने मात्र या प्रकरणाशी आणखी कोणाचा संबंध असल्यास त्यांनी स्वत:हून समोर यावे, असेही बजावले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply