Breaking News

रायगडचे क्रीडामहर्षी

रायगड हा सामजिक कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा जिल्हा. या जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. त्याची दखल त्या – त्या वेळच्या सरकारांना घ्यावी लागली. आंदोलकांच्या या जिल्ह्यात क्रीडाकार्यकर्त्यांचे चांगले जाळे आहे. या जिल्ह्यात क्रीडाक्षेत्रातदेखील आता हळूहळू प्रगती होतेय. रायगड जिल्ह्याची क्रीडाक्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी ज्या काही मोजक्या लोकांनी प्रयत्न केले त्यात नथुराम पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नथुराम पाटील (भाऊ) यांनी या जिल्ह्यात विविध क्रीडाप्रकारांच्या संघटना स्थापन करून, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन खेळांचा प्रसार केला. त्याची फळे रायगडच्या खेळाडूंना मिळत आहेत.

नथुराम जानू पाटील यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील वाघवीरा येथे 16जुलै 1939रोजी झाला. एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेतले. जिल्हा परिषदेत नोकरी करत असताना  त्यांना क्रीडाक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी क्रीडाक्षेत्राला वाहून घेतले. स्व. प्रभाकर पाटील जेंव्हा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष झाले, तेंव्हा त्यांनी नथूराम पाटील यांना प्रथम कबड्डी असोसिएशनमध्ये काम करण्याची संधी दिली. 1966 ते 1972 या कालावधीत नथूराम पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. 1972 ते 2013 या कालावधीत त्यांनी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह पदाची जबाबदारी समर्थपणे  सांभाळली. याच कालावधीत रायगड जिल्ह्याच्या पुरूष कबड्डी संघाने राज्य अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धा चार वेळा जिंकली. अनेक  राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. चार कबड्डीपटूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.  नथुराम पाटील यांनी रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे कार्यवाह, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे  उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्यवाह, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाह, महाराष्ट्र कॅरम असोसिएशचे प्रमुख कार्यवाह, रायगड जिल्हा सायकलिंग असोसिएशचे कार्यवाह, रायगड जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे कार्यवाह, रायगड जिल्हा हौशी बेसबॉल असोसिएशनचे कार्यवाह ही पदे सांभाळली. रायगड जिल्हा क्रीडा परिषद सदस्य, रायगड जिल्हा स्टेडियम समितीचे ते सदस्य होते. आपल्यावर पडलेल्या प्रत्येक पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.

भाऊंमुळे अनेक खेळाडूंना राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. त्यांना ज्युनियर असलेल्या कार्यकर्त्यांनादेखील हा पुरस्कार मिळाला होता. परंतु भाऊंना  मात्र हा पुरस्कार मिळत नव्हता. अनेकवेळा मी त्यांना याबाबत विचारले. ते म्हणायचे आपले काम आपण करायचे. पुररस्कारासाठी काम करायचे नाही. त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी भाऊंना या पुरस्कारासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा आग्रह धरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाऊंनी पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव राज्य  शासनाकडे पाठवला होता. अखेर नथुराम पाटील यांनी क्रीडाक्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले. तसेच त्यांना रायगड भूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, यूआरएल फाऊंडेशन क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, आगरी समाजरत्न पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले.

भाऊ एक हाडाचे क्रीडा कार्यकर्ते होते. त्यांची एक दुचाकी होती. त्यावरच त्यांनी अनेक वर्षे खेळांच्या प्रसारासाठी जिल्हाभर प्रवास केला. कबड्डी, खो – खो, कॅरम, अ‍ॅथलेटिक्स कोणत्याही खेळाची स्पर्धा असो भाऊ तेथे सर्वांच्या आधी पोहचायचे. स्पर्धा संपल्यानंतरच तिथून ते निघायचे. पहाटेपर्यंत जरी स्पर्धा चालू राहिली तरी भाऊ मैदानातून हलायचे नाहीत. त्यांच्या प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे ज्यूनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धा झाली. रोहा येथे गोल्डकप कबड्डी स्पर्धा झाली. आरसीएफ क्रीडासंकूलात छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळेस महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व रायगड  जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यात वाद झाले. ही स्पर्धा रायगडातून दुसर्‍या जिल्ह्यात नेण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले. परंतु भाऊंनी आक्रमक भूमिका घेऊन स्पर्धा रायगड जिल्ह्यात खेळवली.

भाऊ केवळ हाडाचे क्रीडा कार्यकर्ते नव्हे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा वचक होता, दरारा होता. कागदावर एकदम फिट रहायचे, असे ते कार्यकर्त्यांना सांगायचे.

कबड्डीमुळे नथुराम पाटील यांची रायगड जिल्ह्यात तसेच संपूर्ण राज्यात ओळख असली तरी त्यांनी इतर खेळांसाठीदेखील बरंच काही केले आहे. क्रीडा संघटना स्थापन केल्या. गावागात जाऊन छोट्याछोट्या स्पर्धा आयोजित करणे, पंच शिबिर घेणे अशी कामे भाऊंनी केली. त्यातून या जिल्ह्यात क्रीडा कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले. जिल्ह्यात क्रीडा कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण झाली, रायगड जिल्हा क्रीडाक्षेत्रात प्रगती करतोय. खर्‍या अर्थाने नथुराम पाटील रायगडचे क्रीडामहर्षी होते.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply