खालापुरातील महिलांचे निवेदन
खोपोली : प्रतिनिधी
सतत खंडित वीज पुरवठा, धोकादायक, उघडे विद्युत जनित्र याबाबत बचत गटाच्या महिलांनी खालापूर महावितरण कार्यालयातील अधिकार्यांना जाब विचारत कारभार सुधारण्यासाठी निवेदन दिले.
सध्या महावितरणने वीज बिल वसुली एवढेच ध्येय्य ठेवले असून, ग्राहकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खालापूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आठवडाभरात पन्नास तासापेक्षा अधिक तास बत्ती गुल होते. त्याचा फटका व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना बसत आहे. शिवाय सध्या उन्हाचा वाढलेल्या तडाख्यामुळे रूग्ण आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण आणि जागोजागी धोकादायक उघडे जनित्र या बाबत महिला बचत गटाच्या हेमलता चिंबुळकर यांच्यासह महिलांनी उपमुख्य कार्यकारी अभियंता व्हि. व्हि. गायकवाड यांची भेट घेत तक्रारीचे लेखी निवेदन दिले. चिंबुळकर यांनी महावितरण अधिकारी गायकवाड यांना धोकादायक परिस्थितीत असलेल्या जनित्राचीदेखील जागेवर नेवून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.तांत्रिक बिघाड लवकरच दुरूस्त होवून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, असे आश्वासन महावितरणचे गायकवाड यांनी दिले.