Breaking News

महाड-रायगड रस्ता दुरुस्त करावा

स्थानिक ग्रामस्थांची मागणी

महाड : प्रतिनिधी

महाड-रायगड रस्ता गेल्या वर्षापासून खड्डेमय झाला असून, या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण रखडल्याने स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि शिवप्रेमींचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग बांधकाम विभागाकडे केली आहे.

ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड-रायगड हा सुमारे 24 किमीचा रस्ता आहे. या रस्त्याच्या  रुंदीकरणाचे काम सुरु झाले होते. मात्र ते मंद गतीने सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. खासदार संभाजीराजे यांनीदेखील या रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी केली होती. बांधकाम विभागाने ठेकदार कंपनीकडून हे काम काढून घेतले आहे, त्याला आता दोन वर्षे झाली तरी या रस्त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही.

महाड-रायगड रस्त्यावरील नातेखिंड, तेटघर, काचले, नाते, चापगाव, वाडा ते कोंझर आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर काचले, चापगाव या ठिकाणी मोर्‍यांसाठी केलेल्या खोदकामांमुळे तेथे वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यातच महाड-रायगड रस्त्याच्या साईडपट्टीला खाजगी कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. रुंदीकरण आणि केबलसाठी   केलेले खोदकाम यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, एसटी  बसेस, दुचाकीस्वार, पर्यटकांची वाहने यांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

या रस्त्याच्या दूरवस्थेकडे स्थानिक लोकप्रतिनिधी  दुर्लक्ष करत असल्याने अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या वेळी प्रभाकर सावंत, अविनाश चव्हाण, निलेश पवार, कमलेश कोर्पे, निलेश देवगीरकर, लहू औकीरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून घेतला आहे. महामार्ग बांधकाम विभागाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे, त्याचे काम काढून घेतले आहे. यामुळे या रस्त्याला नक्की वाली कोण?, असा प्रश्न या वेळी पत्रकार निलेश पवार यांनी उपस्थित केला. तर झालेल्या खड्ड्यांनी वाहनांचे आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचे प्रभाकर सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. हा रस्ता तत्काळ दुरुस्त व्हावा, अशी मागणी या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply