Breaking News

उरणमध्ये महावितरणची वीज बिल वसुली

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील वाणिज्य, घरगुती व सार्वजनिक वीज बिलांपोटी असलेल्या सुमारे 16 कोटींच्या थकीत रकमेपैकी मार्चपर्यंत सक्तीच्या वसुलीनंतरही फक्त पाच कोटींची वसुली करण्यात उरण महावितरणला यश आले, तर वीजचोरीची 213 प्रकरणे उघडकीस आली आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतर उरण महावितरणचे उपअभियंता हरिदास चोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे. ग्रामीण भागातील 27 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाइट, दिवाबत्तीपोटी साडेआठ कोटींची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी तीन वेळा नोटिसा बजावल्यानंतरही वीज बिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारत थकबाकीदार ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी जमेल त्याप्रमाणे थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली. मात्र सक्तीच्या वसुलीनंतरही ग्रामपंचायतींकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे साडेसहा कोटींच्या थकीत रकमेपैकी फक्त सहा लाख रुपयेच जमा झालेत. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर टप्पाटप्प्याने स्ट्रीट लाइटची बिले भरण्याची तयारी ग्रामपंचायतींनी दाखविली. त्यानंतरच ग्रामपंचायतींचा खंडित वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उरण महावितरणचे उपअभियंता हरिदास चोंडी यांनी दिली. साडेसहा कोटींच्या वसुलीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, मात्र सक्तीच्या वसुलीला जाणार्‍या कर्मचार्‍यांशी ग्राहक, ग्रामस्थांमध्ये अरेरावी, शाब्दिक चकमक, हाणामारीचे प्रकार घडू लागलेत. काही ठिकाणी वीज बिलवसुली अंतर्गत मागील तीन महिन्यांत वीजचोरीच्या एकूण 213 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. केसेस दाखल झालेल्या अनेक ग्राहकांनी शेजारच्या घरातून वीज घेतली. असे गैरप्रकार करू नयेत. अशा ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा चोंडी यांनी दिला आहे. तसेच थकीत रकमेचा वेळेत भरणा करून महावितरणला ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चोंडी यांनी केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply