मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप नुकतेच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी दीर्घ पत्र लिहून गंभीर स्वरुपाचे अनेक आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्यांना मंत्र्यांनी कशा प्रकारची टार्गेट्स दिली होती, याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. याचबरोबर कोणी कोणी वाझे यांना काय काय सांगितले होते याबाबतची धक्कादायक माहिती या पत्रात नमूद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील अनिल देशमुख यांच्या चुकीच्या कामांची माहिती दिली, मात्र तेथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना तर ही माहिती आधीपासूनच होती हे माझ्या लक्षात आले, असा गौप्यस्फोट सिंह यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.