पनवेल : रामप्रहर वृत्त
महाडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या आपत्तीनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगरच्या वतीने महाडमधील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पूरग्रस्त भागात सेवाकार्य केल्यानंतर तिथे आता वैद्यकीय मदतीचीदेखील आवश्यकता आहे. यासाठी अभाविप व कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमाने व मेडीव्हिजन आणि जिज्ञासा यांच्या विशेष सहकार्याने 7 ते 10 ऑगस्टदरम्यान महाडमधील विविध पूरग्रस्त भागात मिशन आरोग्य मोहीम राबवण्यात येत आहे.
आरोग्य मोहिमेसाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून अभाविपच्या वैद्यकीय टीम महाडमध्ये दाखल झाल्या आहेत. मिशन आरोग्य मोहिमेंतर्गत आतापर्यंत गंधारपाली गाव, कोथिरे गाव, चांबरखिंड, महाड शहर अशा एकूण सहा ठिकाणी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 650 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय शिबिरात एकूण पाच डॉक्टर, 11 वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, चार स्वयंसेवक सहभागी आहेत. या वैद्यकीय शिबीरांच्या ठिकाणी अभाविप कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी भेट दिली. आणखीन दोन दिवस हे आरोग्य अभियान महाडमधील विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे.