Breaking News

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 20) जाहीर केले. त्यानुसार इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मेदरम्यान होणार आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान सरकारसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे यंदा परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेले निर्णय व अन्य महत्त्वाच्या सूचनांची माहिती दिली.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षेचे केंद्र त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल. प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. इयत्ता दहावीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात, मात्र या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. बारावी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांना पाच प्रयोग शिकवणार आणि त्यावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षेसाठी अधिकची वेळ
दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी तीन तास वेळ दिला जातो, परंतु या वर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे, तर 40 व 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
उत्तीर्णतेचे निकष जैसे थे
कोरोना काळ असल्याने विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे निकष बदलले जाणार नाहीत. पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळली आणि त्याला परीक्षा देता आली नाही, तर अशा विद्यार्थ्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply