Breaking News

उल्हास नदीतून पाणीउपसा; नायब तहसीलदारांकडून पाहणी

कर्जत ः बातमीदार

नेरळजवळील दहिवली ग्रामपंचायत तर्फे वरेडी येथे लबधी गार्डन्स लिमिटेड या बांधकाम व्यावसायिकाकडून उल्हास नदीलगत गृहसंकुल प्रकल्प उभारले आहे. या गृहप्रकल्पासाठी शेजारून वाहणार्‍या उल्हास नदीच्या पात्रात वीज पंप लावून पाणी घेतले आहे. दरम्यान, कर्जतचे निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून त्या जागेची स्थळ पाहणी करण्यात आली. दहिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत लब्धी हा गृहप्रकल्प साकारत असून तेथे बांधकामासाठी आणि पिण्यासाठी लागणारे पाणी हे उल्हास नदीतून अवैधरित्या पंप लावून उपसा केले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तसेच उल्हास नदी बचाव मोहीम राबविणारे केशव बबन तरे यांनी माहिती अधिकारातंर्गत मिळविली आहे. याबाबत तरे यांनी कर्जत तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर 24 मार्च रोजी या प्रकरणी कर्जतचे नायब तहसीलदार एस. आर. बाचकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी तक्रारदार तरे आणि दहिवली सजाचे तलाठीही उपस्थित होते.

व्यावसायिकदृष्ट्या गृहप्रकल्प उभारताना संबंधित विभागाच्या परवानग्या घेणे गरजेचे असतेे, मात्र विकसक कायद्याचा भंग करून, कर बुडवून नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर व्यावसायिकदृष्ट्या करीत आहे. त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

केशव बबन तरे, तक्रारदार

दहिवली ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेतून गावातील जलकुंभातून आमच्या प्रकल्पात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आम्ही बांधकाम करण्यासाठी गैरमार्गाने पाणीउपसा केला ही बाब चुकीची आहे.

-विकास जैन, गृहप्रकल्प विकसक

Check Also

समाजकारणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारे आणि …

Leave a Reply